रत्नागिरीच्या कोकरे गावात शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक, कोकरे गावात तणाव
रत्नागिरी| रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून, एका शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोकरे गावात घडली आहे. इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीवर अत्याचार केल्यानंतर निर्जनस्थळी बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत दोघांना अटक केली असून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोकरे गावात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात गावातील तरुणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा तपास सावर्डे पोलीस करत असून पीडित अल्पसंख्याक समाजातील असल्याने सामाजिक तणाव हाताळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्रकृती गंभीर असल्याने पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली. यावेळी दोघांनीही आपले मोबाईल नंबर एकमेकांना दिले होते. आरोपी हा मुंबई शहरात मंडप डेकोरेटरचे काम करतो. दोनच दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याने अल्पवयीन असलेल्या मुलीवरती अत्याचार केले. ही घटना गुरुवारची असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आणखीन तपास सुरू आहे. पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका बंद घराची चावी खिडकीतून मिळवून सदरचा गुन्हा घडलेला आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये हा प्रकार घडला त्या व्यक्तीचा संबंध याच्याशी काही आहे किंवा नाही? याचा तपास सुरू आहे.
ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळी या घरामध्ये राहणारी व्यक्ती ही खेड इथे क्रिकेट खेळायला गेलेली होती. त्यामुळे या प्रकरणी आणखी तपास केला जाईल. त्यानंतरच आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान कोकरे गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर गावात संतापाचे वातावरण आहे. गावात शांतता राखण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणाचा तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.