अविवेकवादातून विनाशाकडे वाटचाल-प्रा.डॉ.प्रकाश मोगले
नांदेड। अविवेकवादातूनच समाज आणि देशाची वाटचाल विनाशाकडे होत असते म्हणून विवेकवादाशिवाय समाज आणि देशाच्या विकासाला दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.प्रकाश मोगले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्यकार्यकरिणीची दोन दिवसीय बैठक व डॉ.हमिद दाभोळकर लिखित भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी या पुस्तकाचे प्रकाशन नांदेड येथे माजी आ.कॉ.पी.जी.दस्तूरकर विचार मंच, दिवंगत पत्रकार अनिल कोकीळ सभागृह, आरंभ मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आली. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन प्रसिद्ध आंबेडकरवादी साहित्यिक तथा कवी प्रा.डॉ.प्रकाश मोगले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अंनिसच्या डॉ.मुक्ता दाभोळकर, अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे उर्फ माई, राजू देशपांडे, राहुल थोरात, अण्णा कळसकर, डॉ.हमिद दाभोळकर, प्रशांत पोतदार, फारुख गवंडी, प्रकाश घगादगीने, रामभाऊ डोंगरे, वायंगणकर, नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, अंनिसचे जिल्हाध्यक्ष ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि.सम्राट हटकर यांच्यासह राज्यकार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा.डॉ.मोगले म्हणाले की, महाराष्ट्रासह देशाला संतांची मोठी परंपरा आहे. संत तुकाराम, समतावादी चक्रधर स्वामी, रामास्वामी पेरीयार, महात्मा बसवेश्र्वर, रघुनाथ कर्वे, गाडगे महाराज आदी महापुरुषांनी समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट रुढी परंपरा नष्ट करण्यासाठी त्या काळात समता आणि विवेकवादाची मांडणी केली. हे कार्य पुढे नेण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना बलिदान द्यावे लागले. सध्या परिस्थिती कठीण असली तरी विवेकवादी विचारातूनच देश आणि समाजाचा विकास साधावा लागणार आहे, असे त्यांनी मांडणी केली.
सामुहिक नेतृत्व हीच अंनिसची खरी ताकद-डॉ.मुक्ता दाभोळकर
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या पश्चात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकारिणीमध्ये सामुहिक नेतृत्व निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या काळात हे काम कठीण वाटले परंतु आज याचे परिणाम अत्यंत चांगले येत आहेत. सामुहिक नेतृत्व हीच अंनिसची खरी ताकद आहे. अंनिसमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःचे एक वेगळे महत्व आहे. डॉ.दाभोळकरांनी सांगितलेल्या चतुसुत्री कार्यक्रमानुसारच अंनिसचे कार्य आगामी काळातही वेगाने वाढेल असा विश्वास अंनिसच्या मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यभरातून विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. आज पहिल्या उद्घाटन सत्रात संघटना बांधणी, वार्तापत्र प्रकाशन विभाग, युवा आणि महिला विभाग, बुवाबाजी संघर्ष कायदा विभाग आदी विभागांचा आढावा घेवून पुढील कार्याची दिशा ठरविण्यात येणार आहे.
उद्या रविवार दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता निर्भय मॉर्निंग वॉक, दुपारी 12 वाजता खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता अंनिसच्या राज्य पुरस्कार व नांदेड येथील हितचिंतकांचा सत्कार प्रसिद्ध साहित्यिक व मानसोपचार तज्ञ डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रा.सुलोचना मुखेडकर, प्रा.डॉ.पुष्पा कोकीळ, कमलाकर जमदाडे, भगवान चंद्रे, चिततोष करेवार, प्रतिभा कोकरे, उषा गहिनवाड, भाऊराव मोरे, हनुमंत खंडगावकर, रवी देशमाने, कपिल वाठोरे यांच्यासह विविध राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.