हिमायतनगर| येथील परमेश्वर जाधव या शेतकऱ्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीमुळे आपले जीवन संपवले, त्यानंतर मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत तक्रार केल्याने तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर व मंडल अधिकारी राठोड यांचा बुधवारी 03 डिसेंबर रोजी सत्कार करण्याची निमंत्रण पत्रिका छापली होती. त्याचं दिवशी तहसीलदार हिमायतनगर यांनी संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित केल्याचे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जा.क्रं.२०२३/ मशाका-१/आस्था-३/टे-२/प्र.क्र.०६ जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी दिनांक ०९/०१/२०२४ यांनी पत्र जारी करून तलाठी पुणेकर यांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. एव्हढच नाहीतर त्यांच्यावर बडतर्फीच्या कार्यवाहीसाठी स्वतः जातीने चौकशी करू असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. त्यांनी केलेल्या निलंबनाच्या कार्यवाहीचे सर्व स्तरातून स्वागत केले जाते आहे, त्या तालाठ्यास सेवेतुन कायम बडतर्फ करावे अश्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. एव्हढेच नाहीतर या प्रकरणात सामील असलेल्या हिमायतनगर नगरपंचायत मधील त्या दोषी कर्मचाऱ्यांना देखील सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी होत असून, आता भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांचा नंबर लागण्याची दाट शक्यता वर्तविली जाते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दत्तात्रय शाहुराव पुणेकर हिमायतनगर येथील तत्कालीन तलाठी यांनी पदाचा गैरवापर करून मौजे हिमायतनगर येथील शेत सर्वे नं. ४१७/२ व ४१७/३ मधील बेकायदेशिर रीत्या घेतलेले फेर क्र ७८३७, ७८३८ व ७८३९ हे रद्द करणेबाबत व संबंधितांवर शासकीय सेवेतून बडतर्फ करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करणे बाबत हिमायतनगर येथील मयत शेतकरी परमेश्वर जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तक्रार दिली होती. त्यावरून तत्कालीन तलाठी पुणेकर यांचे खुलाशातील नमुद मुद्दे व तहसिलदार हिमायतनगर यांनी अहवालात दाखल केले प्रमाणे संबंधीत तलाठी यांचा खुलासा असमाधानकारक असल्याचे नमुद करून पुणेकर तलाठी यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावीत करण्याबाबत अरुणा संगेवार उपविभागीय अधिकारी, हदगाव यांनी दि. २६/१२/२०२३ अन्वये शिफारस केली होती.
शासकीय कामाविषयी गांभीर्य व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणे, वारंवार कामासंदर्भात दिलेल्या सुचनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणे, तसेच शासकीय कर्तव्याची जाणिव न ठेवता शासकीय कामकाज करण्यामध्ये स्वारस्य न दाखवणे, इत्यादी कामात निष्काळजीपणा करून, दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी, यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ३ चे जाणीवपूर्वक उल्लंघन केले आहे. त्यामुळे दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तत्कालीन तलाठी, सज्जा हिमायतनगर, जि. नांदेड यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ८ खाली विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी हदगांव अरुणा संगेवार यांचे दि. २७/१२/२०२३ चे अहवाला नुसार दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी, सज्जा हिमायतनगर, जि. नांदेड यांनी मौ. हिमायतनगर येथील ग.नं. ४१७/३ मधील फेर कं.७८३७ व गट क्र.४१७/२ मधील फेर क्र.७८३८ व ७८३९ हे अभिलेखांची नियमानुसार तपासणी न करता फेर नोंद घेतली आहे. दिलेल्या उद्दीष्टानुसार शासकीय वसुली केलेली नाही. तसेच वारंवार सुचना देवूनही ई-चावडी प्रकरणात १००% वसुली केलेली नाही. तसेच श्री पुणेकर, तलाठी यांनी त्यांचे दप्तर अदयावत ठेवण्यात आलेले नाही. सज्जांतर्गत अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत कोणतीही दंडात्मक कार्यवाही केली नसल्याचे नमुद करून संबंधीत तलाठी यांचेविरूध्द निलंबनाची कार्यवाही करावी म्हणून विनंती केली होती.
दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तत्कालीन तलाठी, सज्जा हिमायतनगर, सध्या तलाठी, सज्जा देवठाणा, ता. भोकर, यांचे उपरेक्त कृत्याचे गांभीर्य विचारात घेत, अभिजात राऊत जिल्हाधिकारी, नांदेड महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४ पोटनियम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन, याव्दारे त्यांना आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून निलंबीत करीत असल्याचे पत्र जारी केले आहे. आणखी असाही आदेश देण्यात आला आहे की, हा आदेश अंमलात असेल तेवढया कालावधीत त्यांचे मुख्यालय भोकर येथे राहील. तसेच त्यांना तहसिलदार भोकर यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी, यांना त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्यासंबंधी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
निलंबनाच्या कालावधीत दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी, यांनी खाजगी नोकरी स्थिकारु नये किंवा चंदा करु नये (त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्यानुषंगाने त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्यात येईल) व त्यांनी तसे केल्यास निलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास ते पात्र ठरतील. निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता जेव्हा जेव्हा देण्यात येईल, त्या प्रत्येक वेळी त्यांना खाजगी नोकरी स्विकारलेली नाही किंवा कोणताही खाजगी धंदा या व्यापार करीत नाही, अशा त-हेचे प्रमाणपत्र संबंधीत अधिका-यांकडे सादर करावे लागेल. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्थियेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ चे नियम ६८ मधील तरतूदीनुसार दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी, यांना निलंबन निर्वाह भत्ता व महागाई भत्ता देण्यात येईल. तलाठी दत्तात्रय शाहुराव पुणेकर, यांच्या विरुध्दच्या विभागीय चौकशी बाबतचे आदेश व चौकशी अधिकारी/सादरकर्ता अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. असे जारी करण्यात आलेल्या पत्रात अभिजीत राऊत, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी म्हंटले आहे. सदर आदेशाचे प्रतिलिपी संबंधित सर्वांना पाठवीण्यात आले असे महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांनी स्वाक्षरीत पाठविलेल्या दिनांक ०९/०१/२०२४ रोजीच्या पत्रात म्हंटले आहे.