किनवट तालुक्यातील दुन्ड्रा येथील 27 जणांची जात वैधता प्रमाणपत्राबाबत 3 नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी
नांदेड| अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी किनवट तालुक्यातील दुन्ड्रा गावातील 27 जणांनी जात वैधतेसाठी अर्ज जात पडताळणी समितीकडे केले होते. संबंधित अर्जदाराना सन 2020 पासून ते आतापर्यत वारंवार नोटीस देवून समिती कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले होते.
परंतु अर्जदार संधी देवूनही सुनावणीस उपस्थित राहीले नाहीत. त्या 27 अर्जदारांसाठी समितीने 3 नोव्हेंबर 2023 रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीस अर्जदारांनी उपस्थित राहावे याबाबत त्यांना समितीच्या वतीने लेखी कळविलेले आहे. तसेच सदर अर्जदार सुनावणीस गैरहजऱ राहिल्यास उपलब्ध कागदपत्राआधारे समिती योग्य तो निर्णय घेईल, असेही आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट (मुख्यालय औरंगाबादचे) उपसंचालक तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.
किनवट तालुक्यातील दुन्ड्रा गावातील मन्नेरवारलू अनुसूचित जमातीच्या त्या 27 जणांना नैसर्गिक न्याय तत्वाच्या दृष्टीकोनातून श्री. पवन अशोक आईटवार व श्री. अशोक नारायण आईटवार यांच्या प्रकरणी या समिती कार्यालयाने पारीत केलेले निर्णय आदेश 1.2.2020 अन्वये व त्यानंतर 6 वेळेस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच दिनांक 10 नोव्हेंबर 2020, 9 डिसेंबर 2020, 26 मे 2022, 5 सप्टेंबर 2023, 21 सप्टेंबर 2023 तसेच 11 ऑक्टोबर 2023 बाबत समिती कार्यालयात सुनावनीस उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. संधी देवूनही अर्जदार समितीस सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे असे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती किनवट, मुख्यालय औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.