नांदेड| बदलत्या काळानुसार चित्रपटाची भाषा बदलली गेली. केवळ करमणुकप्रधान न राहता चित्रपटाने व्यवस्था बदलासाठी हातभार लावला. चित्रपट हा समाज संस्कृतीचा आरसा आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चित्रपट रसास्वाद’ या लघु अभ्यासक्रमाचे उद्घाटन डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दिपक पानसकर होते. कोर्स डायरेक्टर नियाज मूजावर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, संयोजक प्रा. राहुल गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
चित्रपट ही समुहकला असून चौसष्ट कलांमधील अनेक चांगल्या बाबींचा अंगीकार चित्रपट कलेने केला आहे. असे निरीक्षण डॉ. दिपक पानसकर यांनी नोंदविले. भारतातील चित्रपट प्रवाहांची ओळख त्यांनी करुन दिली.
डॉ. मल्लिकार्जुन करजगी आणि नियाज मुजावर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘चित्रपट रसास्वाद’ हा अभ्यासक्रम मोफत असून यानिमित्ताने राज्यभरातील विद्यार्थी विद्यापीठात आले आहेत. उद्घाटन समारंभास शंकरसिंह ठाकुर, मारोती शिकारे, प्रा. कैलास पुप्पुलवाड, डॉ. अभिजीत वाघमारे, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. नामदेव बोंपिलवार, सदा वडजे यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.