‘चित्रपट रसास्वाद’ अभ्यासक्रम एस.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निशुल्क
नांदेड| मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान एस.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘चित्रपट रसास्वाद’ (Film Appreciation) अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठातील चित्रपट रसास्वाद मध्ये चित्रपट माध्यमाची ओळख, तिची भाषा इतर पारंपारिक कलांशी असलेले नाते व सिनेमातील कथा, पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन तसेच इतर चित्रपट निर्मितीतील इतर तांत्रिक बाजूंची ओळख करून देण्यात येईल. याशिवाय या अभ्यासक्रमा दरम्यान काही उत्तम दर्जाचे चित्रपट दाखविले जातील व चित्रपटातील विविध अंगावर चर्चा होईल. हा पाच दिवशीय अभ्यासक्रम एस.टी. प्रवर्गासाठी निशुल्क असून, एफ.टी.आय.आय. या संस्थेतील तज्ञ, चित्रपट अभ्यासक, समीक्षक याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
ज्या चित्रपट निर्मिती विषयक अभ्यासक्रमांचे शुल्क हजारो आणि लाखोंच्या घरात असते, असे चित्रपट निर्मिती विषयक अभ्यासक्रमाचे नांदेड जिल्हा, शहर व परिसरातील कलावंतासाठी मोफत आयोजन करून प्रशिक्षणाची संधी स्वा.रा.ती.म. विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे. मागील काही काळापासून ललित व प्रयोगजीवी कला संकुल विविध अभिनव उपक्रम राबवत असून हा अभ्यासक्रम त्याचाच एक भाग आहे.
चित्रपट रसास्वाद (Film Appreciation) या लघु अभ्यासक्रमाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून, अधिक माहितीसाठी संयोजक प्रा. राहुल गायकवाड (मो.नं.९०४९०४३८९४), प्रा. अभिजित वाघमारे (मो.नं. ७३५०३९८२७३) व प्रा. प्रशांत बोम्पीलवार यांच्याशी संपर्क साधावा.