नांदेड| अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे खरेदी व लागवड करु नये असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी व बियाणे विक्री परवानाधारकांकडुनच कापुस बी.टी.बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केले आहे.
फसवणुक व बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन बियाणे पावतीसह खरेदी करावे. अनधिकृत बी.टी बियाणे खरेदीसाठी बनावट कंपन्या खाजगी एजंट आमिष अथवा प्रलोभन देत असतील तर शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे कराव्यात असेही कळविले आहे.
बाजारात बोगस कंपन्या, खाजगी व्यक्तिमार्फत परवाना नसलेली अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत एच.टी.बी.टी बियाणांना काही व्यक्ती ( तणनाशक बीटी ) ( आरआरबीटी ) व बीटी-बीजी-3 ) या नावाने संबोधतात. ( तणनाशक बीटी ) ( आरआरबीटी ) व बीटी-बीजी-3 ) या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही. अशा प्रकारचे बि-बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे.
या प्रकारचे अनधिकृत कापुस बियाणे लागवड केलेल्या कापुस पिकाचे पानांचे नमुने व उत्पादीत कापसाचे नमुने घेऊन त्यांची एच.टी.बी.टी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. त्याचे नमुने तपासणीअंती एच.टी.बी.टी जनुके आढळल्यास संबंधितावर अनुषंगीक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत एच.टी.बी.टी बियाणे आढळल्यास त्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येइल. कृषि व पोलीस विभाग सतर्क असुन एच.टी.बी.टी बियाणे विक्री करण्याऱ्यांवर बारीक लक्ष ठेवुन असल्यामुळे कोणीही हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करुन नये, असेही कृषि विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
शासनाची मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी बियाणे लागवडी नंतर ग्लायफोसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. दरम्यान ग्लायफोसेट हे तणनाशक कार्सिनोजनीक गुणधर्माचे असुन त्याच्या वापरामुळे मानवी आरोग्यास कँन्सरसारखे रोग उदभवण्याची शक्यता आहे. त्याच्या अतिवापरामुळे जमीनीची सुपिकता नष्ट होऊन भविष्यात त्या जमीनीत कोणतेही पिक लागवड करता येणार नाही व जमीन नापीक होईल. सर्व शेतकरी, शेतमजुर यांचे आरोग्य धोक्यात होईल. ग्लायफोसेट या तणनाशकाचा केवळ पिके नसलेल्या जमीनीवर व चहा मळयासाठील वापर करण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे.
या व्यतिरिक्त ग्लायफोसेट हे तणनाशक इतर पिकांवर वापरता येणार नाही. मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी कापसाची लागवड रोखण्यासाठी व कार्सिजोनिक गुणधर्म असलेल्या ग्लायफोसेटच्या वापरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी व परवानाधारक विक्रेत्याकडूनच कापूस बियाणे खरेदी करावे असेही कृषि विभागाने कळविले आहे.