हिमायतनगर | अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे प्रचंड नुकसान, वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च या आर्थिक विवंचनेत अडकलेल्या लक्ष्मण पोतंन्ना पालजवाड (वय ४५, रा. आदेगाव, ता. हिमायतनगर) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत पालजवाड यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. दोन मुली व एक मुलगा यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ते झटत होते. मात्र सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यालगतची शेती वाहून गेली. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक तणावामुळे त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाला बैलाच्या बेरडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

हि घटना लक्षात येताच शेजारी शेतकरी व गावकरी घटनास्थळी धावून आले. तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या अतिवृष्टीत शेतीचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. उलट बँकांकडून कर्जफेडीसाठी नोटिसा मिळत होत्या. त्यातच इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या फीचा प्रश्न, इतर मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घरगाडा चालविण्याची कसरत या विवंचनेत पालजवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, शेतकऱ्यांसाठी ठोस मदत व उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
