नांदेड। स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त सुप्रसिद्ध गायिका मेघा गायकवाड जोंधळ संचलित स्वरमेघ संचाच्या वतीने आयोजित तेरे सुर और मेरे गीत कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमारंभी विशेष अतिथी सौ. प्रतिभाताई प्रतापराव चिखलीकर व श्रीजया अशोकराव चव्हाण तसेच प्रमुख अतिथी वस्तू व सेवाकर उपायुक्त निलेश शेवाळकर, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे-धुतराज, सौ. संगीता व रमाकांत चाटी, संपादक केशव घोणसे पाटील, डॉ. हंसराज वैद्य, प्राचार्य केशव जोंधळे, अॅड. गजानन पिंपरखेडे, डॉ. सिद्धार्थ जोंधळे, प्रमुख गायक प्रमोद सरकटे, पल्लवी (हैद्राबाद), अतुल कौटकर, मंजुर हाशमी, सौ. नंदा व इंजि. संजीवन गायकवाड आणि संयोजिका मेघा गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
तेरे सुर और मेरे गीत कार्यक्रमात प्रारंभी आयेगा आनेवाला, तु जहाँ जहाँ चलेगा, रहे ना रहे हम, पिया तोसे नैना लागे रे, सनम तु बेवफा के सामने व थाडे रहिओ वो बाकेलाल ही गीतश्रृंखला ख्यातकीर्त गायिका मेघा गायकवाड यांनी सादर करून रसिकांची प्रचंड दाद मिळवली. मंजुर हाशमी यांनी भारतरत्न स्व. लता मंगेशकर, अमीन सयानी व पंकज उदास यांच्या श्रद्धांजलीपर देखी जमाने की यारी बिछडे सभी हे गीत सादर केले.
सुप्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे यांनी चेहरा है या चाँद खिला है, नाम गुम जायेगा, मेरे नैना सावन भादो, चिठ्ठी आई है ह्या गीतांसह मेघा गायकवाड यांच्या साथीने शौखीयोमे घोला जाये, तुम आ गये हो नुर आ गया है, अपने प्यार के सपने सच हुये, मुझे नौलखा मंगा दे रे आदी सुरेल गीतं सादर करून रसिकांची वाहवाह मिळवली.
प्रसिद्ध गायक अतुल कौटकर यांनी रोजा जानेमन या गीतासह मेघा गायकवाड यांच्या साथीने प्रसिद्ध शास्त्रीय गीत मेरे ढोलना सुन तेरे प्यार की धुन हे युगल गीत सादर करून रसिकांची प्रचंड दाद मिळवली आणि प्रसिद्ध गायिका पल्लवी यांच्या साथीने रमता जोगी ही गीतरचना सादर केली.
मेघा गायकवाड आणि पल्लवी यांनी तेरी मेहफील मे किस्मत आजमाकर हे गीत अनोख्या शैलीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कुछ ना कहो ह्या डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांच्या गीताने कार्यक्रमात अनोखा रंग भरला. मंजूर हाशमी यांनी किसी ना किसी से कभी ना कभी या गीतासह पल्लवी यांच्या साथीने ये पर्वतो के दायरे तसेच मेघा गायकवाड यांच्या साथीने तुमने पुकारा और हम चले आये हे प्रसिद्ध गीत सादर केले.
यावेळी स्वरमेघ संचालिका मेघा संजीवन यांनी सादर केलेल्या तेरे सुर और मेरे गीत या गीतास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक गाण्यातून हा कार्यक्रम बहरत गेला व सुंदर सुंदर गाणी सादर करून कार्यक्रमाची नजाकत वाढत गेली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. स्मीता मोहरीर यांनी केले. यावेळी प्रसिद्ध वादक शेख नईम, महेंद्र कदम, रतन चित्ते, सिद्धोधन कदम, राहुल जमदाडे, किशोर राज व स्वप्निल धुळे यांनी उल्लेखनीय संगीत साथ केली. शेवटी मिले सूर मेरा तुम्हा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.