प्रसिद्ध उद्योजक गंगाधरराव चालीकवार यांचे निधन
नांदेड| शहराच्या गोकुळनगर भागातील प्रसिद्ध उद्योजक गंगाधरराव ज्ञानोबा चालीकवार (वय १०२ ) यांचे आज शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३.३५ वाजता निधन झाले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते, दैनिक सत्यप्रभाचे माजी मुख्य संपादक ओमप्रकाश चालीकवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शहराच्या गोकुळनगर भागातील प्रसिद्ध उद्योजक गंगाधर ज्ञानोबा चालीकवार यांचा विविध ठिकाणी सिनेमागृहे तसेच ऑइल मिलचा व्यवसाय होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी व्यवसायात आपला जम बसविला होता. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. सचोटी, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्तेपणा ही त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या चारही मुलांना सुसंस्कारित करून व्यापार क्षेत्रात भरुडझेप घेण्याची प्रेरणा दिली. साधी राहणी आणि उच्च विचार असे व्यक्तीमत्व असलेले गंगाधरराव यांना सर्व जण आदराने अण्णा या नावाने संबोधन करीत असत.
गेल्या दोन दिवसांपासून वृध्दापकाळामुळे त्यांची प्रकृती काहीशी खालावली होती.शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३.३५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहीती मिळताच विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन चालीकवार कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी सकाळी १०. ३० ते ११ च्या दरम्यान गोकुळनगर येथील त्यांच्या निवास्थाना पासून निघणार असून गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.