एकघरी फाटा – बिरसा मुंडा चौक ते वाशीच्या बोगस रस्ताकामाची चौकशी करा अन्यथा दत्ता शिराणे करणार आमरण उपोषण

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलनगन राज्याकडे जाणाऱ्या एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्त्याचे काम अतिशय बोगस दर्जाचे करण्यात आले आहे. सदरचा रस्ता करताना ठेकेदाराने अभियंत्याशी मिलीभगत करून शासनाच्या मुळ अंदाज पत्रकाला बगल देऊन केल्याने डांबरी रस्ता हाताने निघत असून, सिमेंट काँक्रेट रस्त्याला देखील तडे जाऊन अनेक ठिकाणी उखडला आहे. अवघ्या महिन्यातच खचू लागलेल्या या बोगस रास्ताकामाची सखोल चौकशी करून दोषी अभियंते व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी. आणि रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार पुन्हा करून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे यांनी केली आहे. निकृष्ट रस्ता व पुलाच्या कामाच्या चौकशीस विलंब अथवा टाळाटाळ केल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांना दिलेल्या निवेदनात दत्ता शिराणे यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील एकघरी फाटा, बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून जवळपास ५ ते ७ कोटी रूपये निधी मंजूर झाला. या मंजूर निधीतून या अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, सिमेंटीकरण, पुल व पुलमोर्या तसेच साईड पट्ट्या भरणे यासह अन्य कामे अंदाजपत्रकात दिलेल्या नियमानुसार करणे बंधनकारक होते. तसेच कामांच्या ठिकाणी मंजूरी फलक लावणे अनिवार्य असताना ठेकेदार यांनी फलक तर लावलेच नाही. जुना उखडलेला डांबरीकरण रस्ता उखरूण मजबुतीकरण करावयाचे असताना ठेकेदार यांनी पहिल्याच रस्त्यावर दोन इंच डांबरीकरणाचा लेयर टाकून हा रस्ता पुर्णत्वास आणला आहे.
सदर कामामध्ये कमी मटेरियलचा वापर करूण शासनाच्या मुळ अंदाज पत्रकाला बगल देऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम उरकण्यात आले आहे. एका नाल्यावर नवीन पुलमोर्या उभारणे गरजेचे असताना पहिलेच पाईप टाकलेले कायम ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिनी पुलाच्या बांधकामात ही मोठी अनियमितता असून, अनेक हिकानी पुलास तडे गेले आहेत. या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरनाचे काम करताना हवा त्या प्रमाणात डांबर वापरण्यात आला नसल्याने रस्त्याचे काम अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे झाले आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व तसेच उपअभियंता हे सुधारित पद्धतीने मूल्यांकन करून ठेकेदारास बोगस बिले देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाशी गावाजवळ अंदाजे अर्धा किमि सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्यात आला, या रस्स्त्याचे काम करताना ग्रेड मेंटेन न करता डस्टमध्ये काम करण्यात आले आहे. एव्हडेच नाहीतर यात स्टील म्हणजेच गजाचा वापर केला गेला नाही. तसेच सिमेंट काँक्रेट रस्त्याची जाडी देखील कमी केल्याने अवघ्या महिन्याभरातच या सिमेंट काँक्रेट रस्त्याला तडे गेले आहेत. या सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्ता कामाची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी अंतीच ठेकेदारास उर्वरित बिले अदा करावेत. आणि बोगस काम करणाऱ्यावर कार्यवाही करून एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी ही भाजपचे दत्ताभाऊ शिराणे यांनी केली असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच या निकृष्ट रस्ता व पुलाच्या कामाच्या चौकशीस विलंब अथवा टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा ही दत्ता शिराणे यांनी दिला आहे.
