धर्म-अध्यात्मनांदेड
तेलंगणा सीमेवरील पाळजच्या श्री लाकडी गणपती दर्शनाला गणेशोत्सव काळात मोठी गर्दी

भोकर| तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात येणाऱ्या मौजे पाळज गावात श्री लाकडी गणेपतीचे मंदिर आहे. या मंदिरात गेल्या ७५ वर्षांपासून गणेशोत्सव काळात लाकडापासून तयार करण्यात आलेल्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती पाच राज्यात पसरलेली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. भाविकांची होणारी अफाट गर्दी लक्षात घेता या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे.

भोकर तालुक्यातील मौजे पाळज या गावात १९४८ ला प्लेग, गॅस्ट्रोची साथ पसरली होती. तेव्हा गणेशोत्सवात तेलंगणा राज्यातील निर्मल येथून एका कारागिराकडून लाकडी गणपतीची मूर्ती बनवून आणली होती. या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी अकरा दिवसांत साथीच्या रोगावर नियंत्रण आले असे गावकरी सांगतात. साथीच्या रोगावर नियंत्रण आल्याने मूर्तीचे विसर्जन न करता या गावातील लोकांनी दरवर्षी गणपती उत्सवाच्या काळात अकरा दिवस या लाकडी गणपती मूर्तीची पूजा करण्याचा निर्णय घेतला. तसेच अन्य एक दुसरी गणपतीची मूर्ती ठेवण्यात येते. त्या मूर्तीचे विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात येते असे सांगितले जाते. गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून नवसाचे नारळ कापडामध्ये बांधून मंदिर समितीकडे दिले जातात. त्यानंतर नवस पूर्ण झाल्यावर ते कापड सोडून नवस पूर्ण झाल्याचे सांगत लाकडी गणरायाचे भाविक भक्त मनोभावे दर्शन घेतात.
दरवर्षी येथे गणेशोत्सव काळात जवळपास ५० ते ७० क्विंटलचा महाप्रसाद भाविकांसाठी बनविला जातो. येथे मोठा पेंडाल, भक्तासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. गणेशोत्सव पर्वकाळात सकाळी ६.३० व सायंकाळी ६.३० वाजता अशीदोन वेळा लाकडी गणपतीची आरती केली जाते. अकरा दिवस सांस्कृतिक व प्रबोधनकार कार्यक्रम सायंकाळी होतात. या ठिकाणी लड्डूचा प्रसाद बनवला जातो. यापर्व काळात गावातील सर्वच लहान थोर मंडळी आपली सर्व कामे सोडून श्रमदान करतात, दर्शनासाठी विविध प्रांतातून येणाऱ्या भाविकांसाठी येथे उत्तम व्यवस्थाही केली जाते असे मंदिर समितीकडून सांगितले जाते.
