उमरखेड, अरविंद ओझलवार। राज्याची राजकीय तथा सामाजिक परिस्थिती बघता सद्यस्थितीत पोलिसावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली असून समाजविघातक शक्तींना रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी केले.
ते सेवालाल जयंती व शिवजयंती निमित्त आयोजित उमरखेड येथील पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना बोलत होते . यावेळी नायब तहसीलदार रवींद्र पंधरे , ठाणेदार शंकर पांचाळ , पीएसआय अनिल सावळे व इंगळे ,काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे ,भाजप शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार ,माजी नगरसेवक दिलीप सुरते ,रसूल पटेल शिवजयंती महोत्सव समितीचे सचिव ॲड शिवाजी वानखेडे , प्रा डॉ अनिल काळबांडे , साजिद जहागीरदार , रमेश चव्हाण उपस्थित होते .
सर्वप्रथम ठाणेदार शंकर पांचाळ यांनी प्रास्ताविकातून जयंती उत्सवामध्ये शहरात शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले तर प्रकाश दुधेवार , रमेश चव्हाण ,प्रा डॉ अनिल काळबांडे , रसूल पटेल यांनी आपले मत बैठकीतून मांडले .
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी सांगितले की उमरखेड शहरातील शांतता ही फक्त निवडणुका समोर आल्यानंतरच भंग करण्याचा चार-दोन समाजकंटकाचा उद्देश असतो परंतु त्यांना जरब बसवण्यासाठी पोलीस कायद्याची अंमलबजावणी तंतोतंत करील यात कोणी शंका बाळगू नये .
पोलिसांचा धर्म व जात ही फक्त पोलीसच राहत असते
महापुरुषांचे जयंती उत्सव हे मर्यादित न राहता सर्व समाज व जाती समावेशक असले पाहिजे . आजकाल सोशल मीडिया वरून अफवांचे पेव लवकर फुटल्या जाते परंतु पोलीस प्रशासनाचे सोशल मीडियावर करडी नजर असून त्याद्वारे समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले बैठकीचे सूत्रसंचालन व आभार जमादार संतोष चव्हाण यांनी केले .