नांदेड| मंजूर अनुदानापासून वंचीत असलेल्या पूरग्रस्तांना आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आश्वासन दिल्यामुळे सीटूने दि.१२ नोव्हेंबर रोजीचे नियोजित उपोषण स्थगित केले आहे. सीटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीने अनेक मोर्चे आंदोलने करून महापालिका प्रशासनास आणि जिल्हा प्रशासनास धारेवर धरले होते. परंतु महापालिकेच्या जनविरोधी धोरणनुसार अनेक खऱ्या पूरग्रस्तांना पात्र यादी मधून वगळण्यात आले आहे.
शेजारच्या लोकांना नुकसान भरपाईचे पैसे आले परंतु इतरांना मदत मिळाली नसल्याने पीडितांनी काळी दिवाळी साजरी करून आमदार कल्याणकर यांच्या निवासस्थाना समोर उपोषण आणि धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. भाग्य नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी आमदाराच्या घरा समोर आंदोलन करता येणार नाही आणि तशी परवानगी देणार नाही असे स्पष्ट केले होते.
तेव्हा सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड आणि सहकाऱ्यांनी आमदार कल्याणकर यांची शनिवारी भेट घेऊन चर्चा केली आणि संपूर्ण हकीगत त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नियोजित आंदोलन असल्यामुळे चारसे ते पाचशे पूरग्रस्त दुपारी दीड वाजता आमदारांच्या मालेगाव रोड गोविंद निवास येथे पोहचले होते. पत्रकार आणि पोलीस कर्मचारी देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते. आमदार कल्याणकर यांनी सर्वांसमोर येऊन म्हणणे ऐकून घेतले आणि राहिलेल्या पूरग्रस्तांना शंभर टक्के मदत मिळेल असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी काळजी करू नका मी आता तात्काळ महापालिका प्रशासनास बोलतो आणि नुकसान होऊनही लाभ पासून वंचीत राहिलेल्याना मदत करतो असे म्हणाले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील दिवाळी नंतर पीडिताना पैसे वर्ग केले जातील असे सांगितले आहे. महापालिका वसुली लिपिक आणि तलाठ्यांनी हलगर्जीपणा आणि कामात कसूर केल्याच्या तक्रारी देखील यावेळी करण्यात आल्या. राहिलेल्या पीडिताना लाभ मिळाला नाहीतर अजूनही तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती आहे. यावेळी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.प्रदीप सोनाळे,साई कोमार,मोना सय्यद, फातेमा सय्यद, गणेश थोरात,राजरत्न थोरात, अंजुम बेगम,रितेश नरवाडे,नितीन वठोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदारांनी सर्वांना आपल्या हॉल मध्ये बसवून एक तास चर्चा करून सर्व गाऱ्हाणे ऐकून घेतल्यामुळे पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. उपस्थितितांची पुरवणी यादी प्रशासनास आमदारा मार्फत पाठविण्यात आली असून दिवाळीच्या सुट्या संपल्यावर दुसरी पात्र पूरग्रस्तांची पात्र यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित उपोषण आणि धरणे आंदोलनास स्थगती देण्यात आल्याचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे. पुढील पाठपुरावा संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.