नांदेडलाईफस्टाईल
डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रुग्णाच्या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने जारी केली प्रेसनोट
नांदेड| नांदेडच्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात असलेल्या झाडाखाली विश्रांती घेत असलेल्या एका रुग्णाचे डुकराच्या कळपाने लचके तोडल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आज रुग्णालय प्रशासनाने आपले म्हणणे प्रसिद्धीसाठी दिले आहे. रुग्णालय परीसरातील मोकाट डुकरांच्या बंदोबस्ताबाबत सक्षम अधिकारी महानगरपालिका,नांदेड, पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड व ग्रामपंचायत, विष्णुपूरी यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचेही यात म्हंटले आहे.
शनिवार दि.11-11-2023 रोजी सकाळी 6.30 वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी,नांदेड येथे परीसरामध्ये एक अनोळखी पुरुष व्यक्ती अंदाजे वय- 35 आढळून आल्याने कर्तव्यावरील सुरक्षारक्षक तसेच वर्ग-4 कर्मचारी यांनी अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील अनोळखी पुरुष व्यक्तीस कर्तव्यावरील सुरक्षारक्षक व वर्ग-4 कर्मचारी यांच्या मदतीने उपचाराकरीता अपघात विभागात हलविले व कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली असता त्या व्यक्तीस मृत घोषीत केले. डॉक्टरांनी याबाबतची माहिती कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांना दिली. तद्नंतर सदर रुग्णांचे मृत्यूचे कारण समजण्याकरीता शवचिकित्सा करण्यात आली.
सदर व्यक्तीबाबत माहिती घेतली असता श्री.तुकाराम नागोराव कसबे, वय -35 वर्ष यांना दि.30-10-2023 रोजी क्षयरोग आजाराच्या उपचाराकरीता श्वसनविकार विभागातंर्गत वॉर्ड क्र 14 मध्ये दाखल करण्यात आलेले होते. सदर रुग्णास Post Tuberculosis with cor – Pulmonale असे आजाराचे निदान झाले. त्या आजाराच्या अनुषंगाने योग्य ते उपचार करण्यात आले. त्यानंतर दि.09-11-2023 रोजी सुस्थितीत सदर रुग्णास औषधीसहीत नातेवाईकांसमवेत रुग्णालयातून सुट्टी देवून घरी पाठविण्यात आले. सदर रुग्ण दि.09-11-2023 रोजीनंतर रुग्णालयात उपचाराकरीता आलेला नव्हता. सदर रुग्ण परस्पर रुग्णालयाच्या परीसरामध्ये कर्तव्यावरील सुरक्षारक्षक व वर्ग-4 कर्मचारी यांना दि.11-11-2023 रोजी सकाळी 6.30 वाजता आढळून आला.
सदरील इसमाच्या शरीरावरील आढळून आलेल्या जखमा हया मृत्यूनंतर झाल्या असल्याचे आणि त्या जखमांचा मृत्यूशी संबंध नसल्याचे शवचिकित्सेमध्ये आढळून आले आहे. अंतिम मृत्यूचे कारण समजण्याकरीता सदर व्यक्तीचा व्हिसरा हा केमिकल ॲनिलेसिस व हिस्टो पॅथोलॉजी तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. रुग्णालय परीसरातील मोकाट डुकरांच्या बंदोबस्ताबाबत सक्षम अधिकारी महानगरपालिका,नांदेड, पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड व ग्रामपंचायत, विष्णुपूरी यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आले आहे.