नांदेड। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेच्या आजी-माजी महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसंग्रामच्या महिला जिल्हाध्यक्षांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला असून त्यात एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत लढावू महिला जिल्हाध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या सौ.सुरेखा पाटील यांचा समावेश असल्याने त्यांच्या माध्यमातून या पक्षाला एक कुशल महिला संघटक, अभ्यासू व प्रसंगी आक्रमक महिला नेतृत्व मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्यापासून दूर होऊन कुशल प्रशासक व दमदार युवा नेतृत्व असलेल्या अजित पवारांनी राज्याच्या शिंदे- फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी होतांनाच थेट पक्षावरच दावा केलेला असून संघटनवाढीवर भर दिलेला आहे त्यामूळेच पूर्विच्या एकसंघ राष्ट्रवादीतील अनेकजणांनी त्यांच्या गटात सामील झालेले आहेत व अन्य पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेणे सुरु केलेले आहे.राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पद त्याचबरोबर,सोबतच्या नऊ कॅबिनेट मंत्रीपदामूळे व विशेषतः कार्यतत्पर कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष विस्ताराचे धोरणामूळे विविध राजकीय पक्षातील प्रस्थापितांना कंटाळून अनेकजण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात डेरेदाखल होत असून जिल्ह्यात याठिकाणी सर्वसामान्याकडे असलेले नेतृत्व तसेच,सत्तेतून जनसामान्यांपर्यंत पोहचण्यापाठोपाठ पद,प्रतिष्ठा मिळत असल्यानेच येथे अनेकजणांचा ओघ सुरु असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आ.विक्रम काळे व पक्षाचे उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष इंजी.विश्वंभर पवार, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर,नांदेड शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे,महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा पूजा पाटील व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्याच उपस्थितीत भोकर येथे मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील,मनसेच्या शहराध्यक्षा जयश्री पाटील व शिवसंग्राम संघटनेच्या महिला अध्यक्षा लताताई शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये नुकताच प्रवेश केला आहे.
सौ.सुरेखा पाटील यांच्या माध्यमातून नांदेड शहर व जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुशल महिला नेतृत्व मिळाल्याने निश्चितच पक्ष बळकट होईल अशी अपेक्षा यावेळी आ.काळे यांनी या प्रवेश सोहळ्यात व्यक्त केली.तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यासम खंबीर लोकनेतृत्वासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून पक्षाला उभारी देण्यासाठी आपण भविष्यात कर्तव्यतत्पर राहू अशी ग्वाही यावेळी सौ. पाटील यांनी दिली सोबतच, लवकरच आपल्या नेतृत्वाखाली राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कार्यरत शेकडो महिलांना पक्षात प्रवेश देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.