हदगाव/हिमायतनगर। राजकारणात कधी काय होईल याचा कधीच नेम नसतो. शिवसेना पक्षातील बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा एक मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. याशिवाय अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व आजी माजी आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्यास उत्सुक आहेत.
खासदार हेमंत पाटील यांनी मराठवाडा आणि विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामातील साखरपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्या दरम्यान दिनेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
दिनेश पाटील हे हिंगोली लोकसभेसाठी ठाकरे गटातील इच्छूक उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे बंधू आहेत. तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री शिनगारे हे त्यांचे मेहूणे आहेत. त्यामुळे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शिंदे गटात प्रवेशाच्या निमित्ताने भेट होती की, जिल्हाधिकारी असलेल्या मेहूण्यासाठी ही भेट होती अशा उलटसूलट चर्चांना उधान आले आहे.
माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोली लोकसभेकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूर्णपणे तयारी करत असताना त्यांचे बंधू दिनेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट नेमकी कशासाठी घेतली याबद्दल स्पष्ट झाले नसले तरी, हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशा बद्दल चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे.
ही भेट सदिच्छा होती की राजकीय स्वरुपाची होती. याबाबत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. मात्र दिनेश पाटील आष्टीकर यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने मतदारसंघातील जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.