श्रामणेर प्रशिक्षण केंद्र जागतिक दर्जाचे होणार – शास्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे

नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मोठ्या प्रमाणावर धम्मचळवळीचे कार्य सुरू आहे. श्रामणेर दीक्षा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकालय, धम्मदान आणि धम्मसंदेश यात्रा, जगातील बौद्ध राष्ट्रांतील धम्मसहल, विविध धम्मसंस्कार, पौर्णिमोत्सव आदी कार्यक्रमांमुळे जगातील बौद्ध राष्ट्रांशी धम्मसंधान साधल्या जात आहे. येत्या काळात हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र जागतिक दर्जाचे होणार ह्यात शंका नाही असे प्रतिपादन येथील शास्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांनी केले. ते मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त आयोजित पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, भिख्खू संघ, एस. एन. गोडबोले, सा. ना. भालेराव, प्रा. एस. एच. हिंगोले, टी. पी. वाघमारे, पीआय बी. एम. मल्हारे, प्रज्ञाधर ढवळे, थोरात बंधू, सिद्धार्थ थोरात, डॉ. साहेबराव खाडे, अॅड. रामानंद सावंत आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर याचनेवरुन भिक्खू संघाने त्रिसरण पंचशील दिले. मार्गशीर्ष पौर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमोत्सव कार्यक्रमांतर्गत सकाळपासून परित्राणपाठ, धम्मध्वजारोहण, त्रिरत्नवंदना, बोधीपुजा, सूत्तपठण, ध्यानसाधना, धम्मदेसना व्याख्यान, भोजनदान, आर्थिक दान पारमिता आदी कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान कुलदीप राक्षसमारे यांचे लाठीकाठी प्रशिक्षण प्रात्यक्षिक सादर झाले. शहरातील श्रद्धा काॅलनीतील बौद्ध उपासिकांकडून भिख्खू संघ आणि उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार प्रा. एस. एच. हिंगोले यांनी मानले.

कार्यक्रमादरम्यान भिख्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. तसेच मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. भिख्खू संघाच्या आशिर्वचनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच शाहीर सुभाष लोकडे आणि संचाचा बुद्ध आणि भीमगितांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, दलित खाडे, दत्ता खाडे, श्रावण खिल्लारे, शेषराव खाडे, दीपक ढगे, मुंजाजी खाडे, आशा खाडे, माजी सैनिक संभाजी सावंत, किशन सावंत, बाबूराव सावंत मंगेश राऊत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विविध ठिकाणच्या बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
