नांदेड। उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचनासाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासाठी हाती घेतलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेत सौरऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार असून त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे टेंडर प्रसिद्ध झाले आहेत व त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील प्रस्तावित २५० मेगावॅट निर्मितीचा समावेश आहे, असे एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी नांदेड सांगितले.
महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. श्यामसुंदर शिंदे, आ. मोहनराव हंबर्डे, आ. राजेश पवार (ऑनलाईन), महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर आणि महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक समीर घोडके उपस्थित होते.
मा. विश्वास पाठक म्हणाले की, शेतकऱ्यांसाठीच्या मुख्यमंत्री सौर उर्जा वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीत सर्वात मोठा अडथळा जमिनीच्या उपलब्धतेचा होता. तथापि, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यामुळे या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आगामी दीड वर्षात या योजनेत मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करण्यात येईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटण्यासोबतच स्वस्तात वीज उपलब्ध झाल्यामुळे क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन भविष्यात उद्योगांसाठी अधिक स्पर्धात्मक दराने वीज पुरवठा करता येईल. ही योजना राज्यासाठी गेम चेंजर आहे.
त्यांनी सांगितले की, वाढत्या मागणीनुसार दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत राज्यामध्ये ४२ हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २७५१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. नवीन उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर्सची क्षमता वाढविणे, विजेचे जाळे मजबूत करणे, स्मार्ट मीटर बसविणे अशी कामे यामध्ये करण्यात येत आहेत. यामुळे वीज वितरणातील समस्या दूर होतील.
मा. श्यामसुंदर शिंदे, मा. मोहन हंबर्डे आणि मा. राजेश पवार यांनी यावेळी वीज ग्राहकांच्या समस्या मांडल्या. शेतीसाठी वीज पुरवठा आणि नवीन वीज उपकेंद्रे उभारणी याबद्दल त्यांनी सूचना केल्या. माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत पाठविलेल्या निवेदनावर चर्चा झाली. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी महावितरणच्या जिल्ह्यातील कामगिरीबाबत सादरीकरण केले.