डेंगू सदृश्य आजाराने हिमायतनगर तालुक्यातील बोरगडीतांडा येथील नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू…!
हिमायतनगर। तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा अंतर्गत येणाऱ्या बोरगडी तांडा परिसरात डेंगू सदृश्य आजाराने एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.१८ मे रोजी घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी तांडा येथे काही दिवसापासून डेंगू सदृश्य आजाराचे बरेचसे रुग्ण आढळले आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलेल्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, टायफाईड, डायरिया, यासह डेंगू सदृश्य आजाराचे लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचं परिस्थितीत मौजे बोरगडी तांडा येथील नऊ महिन्याचा विनायक लखन राठोड याला ताप आल्याने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान ताप काही कमी झाला नाही आणि दि १८ मे रोजी दुपारी २ वाजता डॉक्टरांनी त्यां बालकास डेंगू सदृश्य आजाराने मृत झाल्याचे घोषित केले. त्यां चिमुकल्या बालकाच्या निधनाने बोरगडी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. हा बालक आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आरोग्य विभागाने बोरगडी तांडा परिसरामध्ये डेंगूसदृश्य रुग्णांची तपासणी करून तात्काळ उपचार कैम्प राबविण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.