आर्टिकलधर्म-अध्यात्म

वाढोण्याची नवसाला पावणारी कालिंका माता दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व

हिमायतनगर (वाढोणा) शहराच्या उत्तरेच्या बाजूस असलेल्या नवसाला पावणाऱ्या कालिंकामाता मंदिराला कल्याणीच्या चालुक्य कालखंडाचा इतिहास आहे. याचे पुरावे मंदिर स्थापत्याचे हेमाडपंथी शिळांच्या अवशेषावरून दिसून येतात. या मंदिराची स्थापना १६७९ साली झाली असून, आज ३६८ वर्ष पूर्ण होत आहेत. हिमायतनगरची कुलदैवत असलेली कालिंका माता हि नवसाला पावणारी असून, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे, त्यामुळे नवरात्रोत्सवात मातेच्या दर्शनाला विशेष महत्व आहे.

कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तसृंगी, अश्या साढेतीन शक्तिपीठे असलेल्या देवीचे सामर्थ्य आणि कर्तत्व सर्वांनाच माहित आहे. आदिशक्ती, आदिमाया, अंबाबाई, जगदंबा, महाकाली, भद्रकाली, कृपालिनी, चामुंडा, दुर्गादेवी, चंडिका, अश्या विविध नावाने ओळखल्या जाते. हिमायतनगर येथील कल्याणीचे चालुक्य कालीन नवसाला पावणाऱ्या माता कालिंकेची ओळख अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर आपण करून घेणार आहोत. येथील मूर्ती बाबत आख्यायिका सांगितले जाते कि, वाकाटक, चालुक्याच्या काळात दैत्य राक्षसांनी देवतांसोबत मानवी जातींचा छळ सुरु केला होता. त्या वेळी माताकालिंकेने महिषासुर मर्दिनीचे रूप धारण करून करून दृष्ठ राक्षसांचा संहार करून अपवित्र झालेले वातावरण पवित्र केले होते. त्याच अवतारातील कालिंका मातेची मूर्ती या मंदिरात उभी असून, तमाम भक्तांना आशीर्वाद देत आहे.

कालिंका मातेची मूर्ती शिवकालीन युगात जवळपास ६० फुट जमिनीत होती, सन १६७९ मध्ये कोळसेगिरी ऋषीच्या मार्गदर्शनाखाली एका विशाल वडाच्या झाडाखालील जमिनीतून वर काढण्यात आली. त्यावेळी गावकर्यांनी या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर उभे करून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या काळापासून या मंदिराला कालिंका मंदिराचा नावाने ओळखले जाऊ लागले. मंदिर निर्मित्तीपासून ते आजवर महाराष्ट्रातील तिसरे शक्तीपीठ माहूर गडाचे महंत यांच्या देखरेखीत येथील मंदिराचा कारभार अनेक पुजार्यांच्या हस्ते करण्यात आला. आज घडीला सदर मंदिराचे पावित्र्य राखून पूजा – अर्चनेचे कार्य स्व.श्री दत्ता महाराज भारती यांचे वारस मोहन भारती महाराज यांच्या माध्यमातून केले जात आहे. मातेची मूर्ती हि काळ्या पाषाणातील दगडातून निर्मित्त केलेली असून, अष्ठभूजाधारी आहे.

मूर्तीच्या दोन्ही बाजूने सुरक्षा रक्षक, उजव्या हातात त्रिशूल जे महिषासुर राक्षसाच्या शिरात गाडलेले आहे. वरील उजव्या हातात तलवार व डाव्या हातात घंटा व बाजूला सिंह उभा आहे. मातेच्या मूर्तीची उंची ५ फुट ३ इंच असून, रुंदी ३ फुट १ इंच आहे. सदर मूर्ती हि उत्कृष्ठ कलेचा नमुना असून, मूर्ती स्थापनेनंतर या मंदिराला कालिंका माता असे नाव देण्यात येऊन महिला – पुरुष भक्तांनी पूजा अर्चना सुरु केली आहे. देवीची पूजा- अर्चना करून मनोकामना केलेली इच्छा पूर्ण झालेले सर्व भक्त नवरात्र महोत्सवादरम्यान हजेरी लाऊन हिरवी साडी, चोळी, बांगड्या व खाना -नारळाने मातेची ओटी भारतात. या काळात मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा – आंध्र प्रदेशातील भक्त हजारोच्या संखेने उपस्थित राहून मातेचे दर्शन घेऊन, इच्छा प्रकट करतात.

वर्षभरात येणाऱ्या दर मंगळवारी मातेची आरती, पूजा रात्रीला करण्यात येउन भजनाचा कार्यक्रम घेऊन गोंधळ व जागरण करण्याची परंपरा अनेक वर्षापासून अविरतपणे चालविली जात आहे. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवस म्हणजे विजयादशमी पर्यंत गोंधळ, दांडिया, रांगोळी स्पर्धा, कीर्तन, भजन, झाकी, महाप्रसाद यासह अन्य धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. दरम्यान नवमीच्या दिवशी मातेच्या मूर्तीसमोर होम – हवन करण्यात येते. त्यावेळी मातेची नित्यनेमाने पूजा अर्चना करणाऱ्या महाराजाच्या अंगात देवी शिरल्याने ते अग्नीतून उडी घेतात हे दृश्य पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत भाविकांची गर्दी उसळते. शेकडो वर्षापूर्वी बकरी व रेड्याचा बळी देण्याची परंपरा होती, कालांतराने हि प्रथा बंद करण्यात येउन मूर्तीसमोर ठाकूर परिवारातील मानकऱ्याच्या हस्ते तलवारीने कोहळाच्या फळाचा बळी दिला जात आहे. मानकऱ्याच्या हस्ते पूजा अर्चना करून कालिंका मातेला महानैवेद्य दाखविण्यात येवून, मातेला प्रसन्न करून सुख समृद्धीची कामना केली जाते. त्यानंतर प्रसादाचे वितरण करून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचेद्वार खुले होतात.

विजया दशमीचे महत्व …
प्रथ्वीवर दैत्यांचे साम्राज्य पसरल्याने राक्षसांच्या छळाने लोक त्रस्त झाले होते, या राक्षसांचे परिपत्य करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू, व महेश यांनी एक महान शक्ती निर्माण केली. या महानशक्तीने चार ठिकाणे आपले रूप प्रकट केले. त्यापैकी एक म्हणजे.. अष्ठभुजा कालिंका देवीचे रूप आहे. लपून बसलेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने त्या रेड्याच शीर उडविले होते. त्यावेळी महिषासुर त्या रेड्याच्या शरीरातून अतिशय वेगाने गेला. त्यानंतर देवीने त्याचा वध करून संपूर्ण मानव जातीच्या लोकांना त्याच्या छळापासून मुक्तता दिली. त्यावेळी मातेने विजया हे नाव धारण केलेले असल्यामुळे अश्विन शुक्ल दशमीस विजयादशमी असे म्हणतात.

तसेच प्रभू रामचंद्राने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तो दिवस विजय दशमी म्हणून साजरा होऊ लागला. त्यामुळे या दिवशी विजयादशमी साजरी करण्यासाठी माता कालिंका देवीचे आशीर्वाद घेऊन हजारो भक्त मिरवणुकीत सामील होऊन मातेच्या आदेशाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पाडून जल्लोष साजरा करतात. हि परंपरा वाढोणा वासीय शेकडो वर्षापासून अविरतपणे चालवितात. त्यामुळे येथील कालिंका माता हिमायतनगर(वाढोणा) वाशियांसाठी एक वरदान आहे. मागील साडेतीनशे वर्षापासून भक्तांना आशीर्वाद देत असल्याने शहरातील हिंदू , मुस्लिम व सर्व जाती धर्माची एकतेचि परंपरा टिकून आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसातील देवींची उपासना
भारतीय संस्कृतीत देवी – देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे. नवरात्रोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही, तो सामाजिक व सांस्कृतिक उत्सव बनला आहे. घटस्थापणेदिनी शक्ती देवता दुर्गाची उपासना केली जाते, घटाशेजारी अखंड दीप तेवतच राहतो. घाटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळ बांधतात. द्वितीयचे दिवशी आदिशक्तीची पूजा केली जाते, तृतीयेच्या दिवशी वैदिक देवतेची उपासना, चतुर्थीच्या दिवशी विश्व्यापक जननीची उपासना केली जाते, पंचमीचे दिवशी उपांग ललीतेची उपासना, सहाव्या माळेच्या दिवशी महाकालीची उपासना केली जाते, सातव्या माळेच्या दिवशी महासरस्वतीची आराधना, अष्ठमिचे दिवशी महाष्ठ्मीची उपासना, नवमीचे दिवशी नावपारने करीशी हो…या दिवशी सप्तशृंगीची उपासना, दशमीचे दिवशी आंबा निघे सिम्मोलंघनी .. या दिवशी अंबेची उपासना करून विजय दशमी साजरी केली जाते. या पर्वकाळात वरील देवींची उपासना केल्यास भक्तांना आत्मिक समाधान लाभते असे सांगितले जाते.

…….अनिल मादसवार, हिमायतनगर ( मो.९७६७१२१२१७)

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!