
नांदेड। २१ – २२ आणि २३ फेब्रुवारी अशा तीन दिवशीय नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या माकपाच्या माजी खासदार तथा पॉलिट ब्युरो सदस्या कॉ.वृंदा करात यांनी किनवट येथे झालेल्या जाहीर सभेत आपल्या भाषणातून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या सीटू आणि जमसंच्या साखळी उपोषणाचा उल्लेख केला व शासनाचे लक्ष वेधले.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या कॉ.करात ह्या तीन दिवशीय नांदेड जिल्हा दौऱ्यावर होत्या. दि.२१ फेब्रुवारी रोजी विमानाने त्या दिल्ली वरून नागपूर व तेथून मोटारीने माहूर जि.नांदेड येथे आल्या. दि.२२ फेब्रुवारी रोजी वाई बाजार येथे त्यांचा धरण विरोधी कृती समिती व महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. वाई बाजार येथून भव्य मोटारसायकल फेरी काढून दुपारी एक वाजता किनवट येथील हुतात्मा गोंड राजे मैदानावर त्यांची जाहीर सभा संपन्न झाली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कमिटीच्या वतीने किनवट येथे २२ रोजी रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्या सभेला संबोधित करतांना त्यांनी चार ते पाच मुद्यांवर शासनाचे लक्ष वेधले. त्या मध्ये प्रामुख्याने प्रस्तावित चिमटा धरण अर्थातच निम्न पेनगंगा प्रकल्पास त्यांनी तीव्र विरोध दर्शवीला आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरतीवर बॅरेजेस बांधण्याची मागणी केली. रोजगार हमी योजना कामाच्या दिवसात शंभर दिवस वाढ करण्याची मागणी केली. नवाटी,गायरान,परंमपोक जमिनीचे पट्टे,भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, कंत्राटीकरण या संदर्भात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले होते.
त्याच बरोबर माकप पॉलिट ब्युरो सदस्या कॉ.वृंदा करात यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय,मनपा कार्यालय आणि तहसील नांदेड समोर मागील ११८ दिवसांपासून सीटू आणि जमसंच्या सुरु असलेल्या साखळी उपोषणा संदर्भात जाहीर सभेमध्ये उल्लेख केला आणि जिल्हा प्रशासनाचे तसेच राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधले. या वेळी कॉ.करात म्हणाल्या की, नांदेड मध्ये आमच्या साथीदारांचे चार महिन्यापासून साखळी उपोषण सुरु आहे परंतु त्याची दखल प्रशासन घेण्यासाठी तयार नाही. ही खूपच खेदाची बाब आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मधील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने मोर्चे आंदोलने केलीत व नांदेड शहरासाठी नऊ कोटी रुपये मंजूर करून घेतले परंतु अजून एक करोड रुपये वाटप करण्यात आले नाहीत ते तातडीने वाटप करावेत आणि सीटू व जमसंच्या निवेदना मधील मागण्या सोडवाव्यात.
तसेच पूरग्रस्त तथा सीटू चे कार्यकर्ते कॉ.रामदास लोखंडे यांचा मृत्यू हा मनपाच्या निष्काळजीपणा मुळे झाला असून त्यांनी उपोषणाची नोटीस दिली होती व ते साखळी उपोषणात सामील होते.त्यांना वेळेच्या आत मंजूर अनुदान मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असेही त्या म्हणाल्या. मयताच्या कुटूंबातील एका सदस्यांस मनपा मध्ये शासकीय नोकरी द्यावी व त्यांच्या कुटुंबियांचे नांदेड शहरात पुनर्वसन करावे.आणि आर्थिक मदत करावी ही मागणी त्यांनी केली.
यावेळी मंचावर माकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभने, कॉ.किसन गुजर, जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.अर्जुन आडे,कॉ. किशोर पवार,कॉ.उज्वला पडलवार, धरण विरोधी कृती समितीचे मुबारक तौर, पंजाबराव गावंडे, कॉ.डॉ.बाबा डाखोरे,जिल्हा कमिटी सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.प्रल्हाद चव्हाण, कॉ.जनार्धन काळे, कॉ.शिवाजी गायकवाड, कॉ.अंकुश आंबूलगेकर, कॉ.स्टॅलिन आडे,कॉ. शैलिया आडे, आदींची उपस्थिती होती.
या जाहीर सभेला हजारोच्या संख्येने शेतकरी – कामगार सामील झाले होते.उपरोक्त सभेला नांदेड शहर आणि तालुक्यातून शकडो कामगार उपस्थित होते व त्यांना सभेला घेऊन जाण्यासाठी कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.लता गायकवाड, कॉ. मीना आरसे, कॉ.सुंदरबाई वाहुळकर आदींनी प्रयत्न केले. अशी माहिती माकप जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.
