मांजरम गावाच्या ५ वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेची तक्रार मंत्रालयात
नांदेड। जिल्ह्यातील मोजे मांजरम येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत केलेले अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे ही योजना ५ वर्षापासून रखडली आहे. अशी निवेदनाद्वारे आज मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी तक्रार केली आहे.
पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की , नायगाव तालुक्यातील मांजरम हे गाव सर्वात मोठे गाव आहे. गावची लोकसंख्या १० हजार आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील जनतेची पाण्यासाठी पायपीट होत आहे. त्यामुळे मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांजरम गावासाठी विशेष बाब म्हणून ही योजना २०१८ या काळात मंजुरी दिली होती. ही योजना ८ कोटी रुपयांची आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. सन २०१९ या काळात बारूळ येथील मानार प्रकल्पातील तलावात विहीर काढून मांजरम पर्यंत पाईपलाईन करण्याचे काम संतोष कन्स्ट्रक्शन करत आहेत. गावातील अंतर्गत पाईपलाईन व टाकीचे काम रोहन कन्स्ट्रक्शन करीत आहे. यांनी केलेले कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगसगिरी करत कासव गतीने काम करत आहेत. या योजनेस संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांचा हेतू चांगला नसल्यामुळे ही योजना ५वर्षापासून अपूर्ण अवस्थेमध्ये रखडलेली आहे. यामुळे ही योजना अयशस्वी होण्याची दाट शक्यता आहे.
शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजनेच्या ८ कोटी रुपयाची बट्ट्याबोळ करत विल्हेवाट लावण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि मांजरम गावासाठी पाणीपुरवठा योजना यशस्वी करावी ही विनंती. या निवेदनाची प्रत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील घेण्यात आली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे मुगावकर उपस्थित होते.