नांदेड| वाङ्मयीन क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाणारे रोहिणी वाकडे साहित्य दर्शन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार आशा डांगे, निर्मोही फडके आणि ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांना घोषित करण्यात आले आहेत.
रोहिणी वाकडे प्रतिष्ठानच्या वतीने अकरा वर्षांनंतर पुनश्च पुरस्कारांचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यानुसार २०२२मध्ये प्रकाशित पुस्तकांमधून सर्वोत्तम ठरलेल्या पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार आशा डांगे ( छत्रपती संभाजीनगर) यांच्या ‘प्रिय हा कण गॉड पार्टीकल आहे’ या कवितासंग्रहास तर निर्मोही फडके ( ठाणे ) यांच्या ‘असोनि मुक्त’ या कथासंग्रहास आणि ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर ( नायगाव जि. नांदेड ) यांच्या ‘शाळा’ या कादंबरीस पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी निवडलेल्या पुस्तकांचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ लेखिका आशा पैठणे, प्रा. डॉ. विलास पाटील व विजय गं. वाकडे यांनी काम पाहिले.
या पुरस्कारांचे वितरण दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता केंब्रिज इंग्रजी शाळा, शासकीय विश्रामगृहासमोर, कळमनुरी येथे होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आशा पैठणे राहणार असून स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. तरी साहित्य रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक विजय गं. वाकडे, प्रेरक दत्ता डांगे व कार्यवाह शंतनु वाकडे, शिवाजी गावंडे, डॉ. संतोष कल्याणकर, डॉ. रामदास धांडे यांनी केले आहे.