
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा आज मेघना कावली यांनी पदभार स्वीकारला आहे.
यापूर्वी या पदावर कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी शासनाने मेघना कावली यांची नियुक्ती केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर मेघना कावली यांनी सर्व विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली तसेच विविध विभागांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला.
मेघना कावली ह्या 2021 बॅचच्या आयएएस अधिकारी असून, आपल्या सेवेला परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जालना जिल्ह्यातील परतूर येथुन सुरुवात केली. त्यानंतर त्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून किनवट येथे कार्यरत होत्या. दिनांक 18 मार्च 2025 रोजी त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली असून, आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे. रुजू झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण विकासासाठी नाविन्यपूर्ण योजना हाती घेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच दर बुधवार आणि गुरुवार ते स्वतः सर्व विभाग प्रमुखांसह क्षेत्रभेटी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी संघभावना महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी व कर्मचाऱ्यांनी टीमवर्कच्या माध्यमातून आपली जबाबदारी पार पाडावी. अशी अपेक्षा मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड यांनी व्यक्त केली.
