मराठा आरक्षणासाठी हिमायतनगर – किनवट – भोकर राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन
हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले असून, त्यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषण सुरु आहे. आज बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी येथील सकल मराठा समाज बांधवानी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याच आवाहन केलं असून, हिमायतनगर – किनवट – भोकर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सकाळी ८.३० वाजता सुरु केलं. यामुळे वाहतूक खोळम्बली असून, बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने जनजीवन विसकळीत झाले असल्याचे पाहावयास मिळाले आहे. तसेच रस्त्यावर टायर जाळून शासनाचा चालढकलपनाचा जाहीर निषेध करत एक मराठा लाख मराठा… आरक्षण आमच्या हक्काचं… नाही कुणाच्या बापाचं… अश्या घोषणाबाजी करत शहर परिसर दणाणून काढले होते. २ तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांच्या विनंतीला मान देत आंदोलन शांततेच्या मार्गाने स्थगित करून साखळी उपोषणाला सुरुवात झाली.
हिमायतनगर तालुक्यातील मराठा समाज बांधव मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एकजूट झाला असून, नेत्यांना गाव बंदीचे फलक लावण्यात आले आहे. तर काही गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांनी राजीनामे दिले आहेत. हिमायतनगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात झाले असून, याच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील मौजे कार्ला येथील एका मराठा तरूणाने अचानक विहीरीत उडी घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांनी तरुणाला पकडून अनर्थ टाळला आहे. त्यानंतर मंगळवारी रात्रीला शहरातून शेकडो महिला पुरुषांनी एकत्र येऊन जिजाऊ वंदना करून एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत कैण्डल मार्च काढला आणि समारोप राष्ट्रगीताने केला होता.
त्यानंतर आज दि.01 बुधवारी मराठा आरक्षणासाठी हिमायतनगर – किनवट – भोकर राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे हिमायतनगर शहराचा आठवडी बाजार असताना देखील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. शहराच्या चाहरही बाजूने ठिकठिकाणी आंदोलकांनी रस्ता जाम करून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे .. एक मराठा लाख मराठा…. अशी घोषणाबाजी करत झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शासनाच्या नाकर्तेपणाचा तीव्र शब्दात निषेध करून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर यापुढे शासनाला न झेपणारे आंदोलन करू तसेच यापुढे हिमायतनगर शहरात आमरण उपोषण सुरु केलं जाईल..? असा इशारा दिला आहे. यावेळी आंदोलन शांततेत व्हावे यासाठी हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांनी पोलिसांचा मोठा ताफा बंदोबस्ताला ठेवला होता. २ तासानंतर जिल्ह्यात लागू करण्यात आलेली जमावबंदी नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आंदोलकांनी १०.३० वाजता रस्ता रोको आंदोलनाला स्थगिती दिली. आणि शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी आंदोलक परतले.