
नांदेड। शिक्षणात संवाद महत्त्वाचा आहे संवादातूनच सर्व गैरसमजदाची दरी दूर होऊन कार्यालयीन कामकाजात सुत्रता येण्यास मदत होईल असे मत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी व्यक्त केले.
नांदेड येथील जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदावर रुजू होऊन त्यांना दोन वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, समग्र शिक्षाचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे, कक्ष अधिकारी मदनुरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांच्या पगारी एक तारखेला करणे, शिक्षकांच्या समस्यांची सोडवणूक करणे, संघटनांच्या प्रश्नांना महत्त्व देणे, त्याची सोडवणूक करणे, शालेय गुणवत्ता विकासासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम ठरविणे आदि भविष्यकालीन कामे असून सर्वांचा त्यात सहभाग अपेक्षित असल्याचेही बिरगे यांनी सांगितले.
