नायगाव, रामप्रसाद चन्नावार। शरदचंद्र महाविद्यालय नायगाव येथील ग्रंथालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते . या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी श्री .श्रीनिवास मस्के यांच्या हस्ते करण्यात आले .सर्वप्रथम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ . बी . आर . लोकलवार यांनी केले .
या ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश त्यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला तर उद्घाटनासाठी उत्तर देताना प्रमुख पाहुणे म्हणाले ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठीचा वारसा पुढे चालवण्यासाठी वाचकांना , विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे . अशा ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे चिंतन करण्याची वेळ आज मराठी माणसावर आली आहे .मराठी भाषा काळाबरोबरच संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारचे वाचन साहित्य वाचकाला उपलब्ध करून द्यावे असे मनोगत व्यक्त केले .
मराठी भाषा ही ज्ञान देणारी भाषा आहे अशा सर्व प्रकारचे ग्रंथ आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत यासाठी अशा ग्रंथ प्रदर्शनातून आपल्याला न संपणारे साहित्य सामान्य माणसाला घडवत असते . असे प्राचार्य डॉ . के . हरीबाबू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले . या ग्रंथ प्रदर्शनाचे सूत्रसंचालन डॉ .प्रकाश हिवराळे यांनी केले ,तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा .बालाजी गायकवाड यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . ग्रंथ प्रदर्शनातील कथा ,कादंबरी , कविता ,आत्मचरित्र अशा तत्सम साहित्याचा आस्वाद उपस्थितांनी ग्रंथ प्रदर्शनाच्या साहित्यातून घेतला .