हदगाव/नांदेड। आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक चळवळीत सक्रीय राहून पक्षसंघटन वाढीसाठी बहुमोल योगदान देणारे युवा कार्यकर्ते अरुण सुकळकर यांची पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या या निवडीबद्दल नांदेड उत्तर मतदारसंघात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून तसेच विभागीय संघटक संजय कोडगे, माजी मंत्री सूर्यकांता ताई पाटील, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुकळकर यांची निवड केली आहे.
सुकळकर यांचे तालुक्यातील सिब्दरा हे मूळ गाव असून तालुक्याच्या राजकारणात त्यांचा चांगला वावर आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. पक्षाचे तीन वेळा जिल्हाध्यक्षपद भूषविणारे आमदार राम पाटील रातोळीकर यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हाभरात पक्षवाढीस लागला पाहिजे, तळागाळातील कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत झाले पाहिजे, या उद्देशाने आणि आ. रातोळीकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत अरुण सुकळकर यांनी 15 वर्षे भाजयुमोचे सरचिटणीसपद भूषवितानाच भोकर विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक म्हणूनही यशस्वी कामगिरी बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला मताधिक्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
संघटन कौशल्यात हातखंडा असलेले सुकळकर हे तरुण नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी सुकळकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे. सुकळकर यांच्या या निवडीबद्दल आ. राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकार्यांनी अभिनंदन केले असून सुकळकर यांनीही पक्षनेतृत्वाचे आभार मानले आहेत.
संधीचे सोने करू – सुकळकर
भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदाची निवड करून पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नसून कार्यक्षेत्रातल्या सर्वच भागात मोठे संघटन उभे करून पक्ष वाढीसाठी काम करणार असून. आमदार राम पाटील रातोळीकर व जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष अरुण सुकळकर यांनी बोलताना सांगितले