बेलगावकर महाराजांची कहाळ्यात दिनांक 27 डिसेंबरपासून भागवत कथा
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील कहाळा खुर्द येथील दत्त मठ संस्थानाच्या वतीने श्री दत्तात्रेय जयंती निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांची दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 02 जानेवारी 2024 पर्यंत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीदत्त मठ संस्थानातील श्री संत बालयोगी देवपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूज्य महंत रवींद्रपुरी महाराज मठ संस्थान फुल डोंगरगाव, परमपूज्य महंत जीवनदास महाराज मठ संस्थान चुडावा, परमपूज्य उत्तम महाराज तीर्थधानोरा, परमपूज्य नीलकंठ महाराज कहाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कहाळा खुर्द येथील श्रीदत्त मठ संस्थानच्या वतीने दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 02 जानेवारी 2024 पर्यंत अखंड दत्त नाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कलशारोहण कार्यक्रम यांच्यासह महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
दररोज पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी नऊ ते बारा महापूजा, दुपारी दोन ते पाच श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, सायंकाळी सात ते आठ आनंद पाठ व महापूजा रात्री नऊ ते 11 दत्त भक्त पारायण व रमेश महाराज माऊलीकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता श्री दत्तात्रेय प्रभू प्रगट सोहळा, गुलालाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कहाळा, पेठवडज, कौडगाव, लाट खुर्द, थडीबोरगाव, मरवाळी येथील भजनी मंडळाचा सहभाग होणार आहे. दिनांक दोन जानेवारी रोज मंगळवारी सकाळी दहा वाजता कळशा रोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दरम्यान होम हवन वेदमूर्ती मनोज गुरुजी जोशी पेठवडजकर, वेदमूर्ती बालाजी महाराज जोशी पेठवडजकर सर्व वेद मूर्तीच्या हस्ते होणार आहे.
2 जानेवारी 2024 रोजी दुपारी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादाचे अन्नदाते मुलचंदशेठ (वाहेगुरू निवास सिंधी कॉलनी नांदेड) हे आहेत. दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी पहाटे पाच वाजता पालखी मिरवणूक व काकडा आरती होऊन सप्ताहाची सांगता होईल या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त भक्त मंडळी कहाळा खुर्द, पेठवडज, कौडगाव, येंडाळा, महाटी, बाभूळगाव, लाट खुर्द, हातनी यांच्यासह अनेक भक्तांनी केले आहे. दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व कळसारोहन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भक्त मंडळीकडून मोठे परिश्रम घेतले जात आहेत.