श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| विशेष सहाय योजनेतून विधवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्ती लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीच्या दाखल्याचा तगादा लावला जातो. आता त्यातून सुटका होण्याची संधी ॲपमुळे उपलब्ध झाली असून निराधारांना आता घरूनचे हयात प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. या ॲपचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी गैरसोय टाळावी असे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे.

बेनिफिशियरी ॲप तसेच आधार फेस आरडी ॲप या दोन ॲपचा उपयोग करून आपल्या स्मार्टफोन वरून घरबसल्या काही मिनिटांत हयात प्रमाणपत्र तहसीलदार माहूर यांच्याकडे दाखल करू शकतात. हे ॲप वापरून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांचा लाभ चालू ठेवता येतात. या योजनांचा लाभदरवर्षी चालू ठेवण्यासाठी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. या नवीन सुविधेमुळे ही प्रक्रिया सोयीची बनलीआहे माहूर तालुक्यात सर्व योजनांमध्ये 401 लाभार्थी असून यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना मध्ये 386 तर इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेत 15 असे लाभार्थी माहूर तालुक्यात आहेत

विधवा योजना लाभार्थ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ॲप मोफत डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर त्यात आधार क्रमांक नोंदवून चेहरा स्कॅन करावा, नंतर आधार फेस आरडी ॲपद्वारे सुरक्षित चेहरा ओळख प्रक्रिया पूर्ण करावी. अशा यशस्वी सत्यापनानंतर डिजिटल जीवन हयात प्रमाणपत्र लगेच तयार होईल आणि ते संबंधित विभागाकडे तहसीलदारांकडे आपोआप पाठवले जाईल.

ही डिजिटल प्रक्रिया सुरक्षित, विश्वासार्ह आधार आधारित फेस ऑथेटिकेशनमुळे पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहे. हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी यापुढे लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे फेरे टळतील. या प्रक्रीयेमुळे लाभार्थ्यांचा वेळ, पैसा वाचणार आहे. तसेच लाभ घेणे देखील अधिक सोयीचे जाणार आहे.हयात प्रमाणपत्रासाठी आता कार्यालतयात खेटे मारावे लागणार नसल्यामुळे निराधार लाभार्थ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन प्रक्रिया अंतर्गत गोरगरीब निराधाराना कुठलाही त्रास होऊ नये या महत्त्वाकांक्षी योजनेत गोरगरीब निराधारांच्या मोबाईलवरूनच ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. ज्येष्ठ आणि दिव्यांग लाभार्थ्यांचा शारीरिक त्रास वाचेल त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन अभिजीत जगताप तहसीलदार माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड यांनी केले आहे.
