आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा; लातूर विभागातून माहूर तालुका पत्रकार संघ ठरला पुरस्काराचा मानकरी

माहूर| मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची आज दिनांक ३ रोजी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी घोषणा केली आहे.त्यात लातूर विभागातून माहूर तालुका पत्रकार संघ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. येत्या १३ जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात माहूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम देशमुख यांनी दिली आहे.
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपआपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असतात, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असतात.अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्यस्तरावर गौरव करण्याचा निर्णय परिषदेने घेतला.त्यानुसार गेली दहा वर्षे मराठी पत्रकार परिषद हे पुरस्कार देत आहे.मराठी पत्रकार परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष “संध्या” कार वसंतराव काणे आणि “संचार” कार रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात.
या वर्षीच्या पुरस्कारांची आज रविवारी घोषणा करण्यात आली.त्यात नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुका पत्रकार संघाची लातूर विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून निवड करण्यात आली आहे.माहूर तालुका पत्रकार संघ हा उपक्रमशील पत्रकार संघ असून वेळोवेळी अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत समाज जागृती चे कार्य करीत असते.माहूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने कोविड मध्ये आई वडिलांचे छत्र हिरविलेल्या ५५ अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांना शालेय साहित्य , दफ्तर, वह्या,पेनी,आणि खाऊ चे वाटप दिनांक १२ जानेवारी २२ रोजी करण्यात आले होते.तर ६ जानेवारी २३ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गोर गरीब गरजूंना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले.
या शिवाय नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबाला १५ मार्च २३ रोजी रोख आर्थिक मदत करण्यात आली.अलीकडेच माहूर तालुका पत्रकार संघाचे सदस्य भीमराव पूनवटकर यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ही रोख आर्थिक मदत करण्यात आली.०६ जानेवारी २२ रोजी स्थानिक धरमवाडी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण, ट्री गार्ड, भेट दिले व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ चे वाटप करण्यात आले होते.वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची दखल घेत मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प़सिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गवर्धन बियाणी यांनी माहूर तालुका पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ म्हणून निवड केली आहे.व माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांचे सह सर्व पदाधिकारी सदस्यांचे अभिंनदन केले आहे.सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
