नांदेड| साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे जागतिक दर्जाचे एकमेव मराठी कादंबरीकार आहेत. भारतीय पातळीवर त्यांच्या उंचीचा दुसरा कादंबरीकार सापडत नाही, मात्र मराठी समीक्षेने त्यांच्याकडे कायमच दुर्लक्ष केले. यासाठी मराठी समीक्षेने त्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि साहित्य अकादमीचे निमंत्रक श्री. विश्वास पाटील यांनी केले.
साहित्य अकादमीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘अण्णाभाऊ साठे: व्यक्ती आणि साहित्य’ या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते. सुप्रसिद्ध दलित विचारवंत अर्जुन डांगळे बीजभाषक म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर साहित्य अकादमीचे अधिकारी ओमप्रकाश नागर आणि डॉ. पृथ्वीराज तौर यांची उपस्थिती होती.
अण्णाभाऊ साठे यांच्यापासून महानगरी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आंबेडकरी साहित्य, कामगार साहित्य यांचे प्रवाह रूढ होतात, असेही विश्वास पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूल्यविचार स्वीकारून शोषित, दलित, श्रमिक, कष्टकरी जीवनाचे चित्र यथार्थपणे साहित्यात व्यक्त करणारे अण्णा भाऊ साठे हे महान कलावंत होते. असे उद्गार आपल्या भाषणात अर्जुन डांगळे यांनी काढले. अण्णा भाऊ साठे यांचा पुरेसा अभ्यास अजूनही झालेला नाही अशी खंतही डांगळे यांनी बोलून दाखवली.
साहित्य अकादमीचे अधिकारी ओमप्रकाश नागर यांनी स्वागत भाषण केले. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यावेळी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. दिवसभर चाललेल्या चर्चासत्रातील दोन सत्रात श्रीकांत उमरीकर व विठ्ठल भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली सोपान खुडे, बळीराम गायकवाड, प्रतीक्षा तालंगकर, प्रमोद गारोडे यांनी मांडणी केली. शिवराज शिंदे आणि किरण सावंत यांनी अण्णाभाऊ साठे यांची गाणी सादर केली. दत्ता भगत यांनी समारोपाचे भाषण केले. समारोप सत्रात ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या विद्यार्थ्यांचा युवक महोत्सवातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राहुल गायकवाड, अभिजीत वाघमारे, प्रशांत बोंपिलवार, नामदेव बोंपिलवार, निशिकांत गायकवाड यांनी चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. चर्चासत्रासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून साहित्य रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. चर्चासत्राच्या निमित्ताने साहित्य अकादमीच्या ग्रंथांचे पुस्तक प्रदर्शन व विक्री ही आयोजित करण्यात आली.