अज्ञात हिंसृ प्राण्याने पाडला वासराचा फडशा, परिसरात जंगली हिंसर प्राणी वावरत असल्याची चर्चा; भितीचे वातावरण

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील देगाव, कुंटूर व कुंटूरतांडा परिसरात जंगली प्राणी वावरत असल्याची चर्चा गेल्या चार पाच दिवसांपासून चर्चा सुरू असून पहाटे देगाव ता. नायगाव येथील श्री खंडोजी किसनराव आकले यांच्या शेतात बांधलेल्या दिड वर्षाच्या कारवडीस पोट फाडून जंगली जनावराने ठार मारल्याची घटना घडली आहे.
देगांव शिवारात घडलेली घटना कळताच वनविभागाचे कर्मचारी राजकुमार गंगाधर भालेराव यांनी घटना स्थळी धाव घेऊन माहिती घेतली असता कुठल्याच प्राण्याचे ठसे त्यांना आढळून आले नसल्याचे निदर्शनास दिसुन आल्याचे सांगितले. अधिक माहिती घेण्यासाठी व घडलेल्या घटनेची पुष्टी करण्यासाठी मयत वासरू जाग्यावर ठेऊन त्या ठिकाणी वाईल्ड कॅमेरा लावण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.
देगांव येथील शेतकरी खंडोजी आकले यांनी संबंधित विभागाला कळविले असून त्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेरामध्ये प्राणी आढळून आल्यास घटनेची पुष्टी करता येईल असे वनविभागाचे अधिकारी हिवरे यांनी सांगितले. आपल्या परिसरात वाघ किंवा जंगली प्राणी अद्याप आढळले नाहीत त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता अफ़वा पसरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे..
