नांदेड| शाळा- महाविद्यालयातून होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत असतो. क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवी संधी मिळते आणि त्यातून अनेक विद्यार्थी घडत असतात, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी केले.
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडला. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे बोलत होत्या. श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्र- कुलगुरू डॉ.माधुरी देशपांडे पुढे म्हणाल्या, संस्कृतिक कार्यक्रमाच्या सहभागाबरोबरच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणातील आपला सहभाग वाढवणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रातील होणारे बदल या संबंधाने ही विद्यार्थ्यांनी जागरूक असण्याची गरज आहे. सद्यस्थितीत महिलांची शिक्षण क्षेत्रात मोठी गौरव सुरू आहे. प्रशासकीय क्षेत्रातही आजच्या विद्यार्थिनी महिलांचा मोठा प्रभाव दिसून येतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. नानासाहेब जाधव यांनी काळानुरूप विद्यार्थ्यांनी नवीन आव्हाने पेलण्यासाठी सिद्ध होण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘वसंत दर्पण’ या भारतीय प्रजासत्ताक दिन भित्तिपत्रक विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर रमेश गिरी यांची शाहिरी आणि पोवाडे हा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. त्याचबरोबर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सतीश कासेवार यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा ही विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शांतादेवी जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड,कनिष्ठमहाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.पी.दिंडे, स्नेहसंमेलनाच्या प्रभारी प्रो.डॉ.रेणुका मोरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख,प्रा.पी.बी.चव्हाण, स्वा रा ती म विद्यापीठाच्या रासेयो चे माजी समन्वयक डॉ.नागेश कांबळे, महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.व्ही.व्ही. मोरे,क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एस. जी. मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.साहेबराव शिंदे आणि संस्कृत विभागाच्या प्रा.नंदिनी सुधळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नागेश कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या नंतर विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.