प्रभू श्रीराम जन्मभूमीहून आलेल्या आमंत्रण रुपी अक्षताचे शिवणी नगरीत उत्साहात स्वागत
शिवणी| किनवट तालुक्यातील शिवणी येथे काल दि.२३ डिसेंबर शनिवार सायंकाळी शिवणी नगरीत प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरी हुन आलेल्या आमंत्रण रुपी अक्षताचे सकल हिंदू बांधवाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.या वेळी अक्षता कलशाचे शिखर कैलास टेकडीचे विश्वस्त संत श्री लिंबाजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी शिवणी येथील सकल हिंदू समाज बांधव आणि विविध मंदिराचे अध्यक्ष, श्री आयप्पा सेवा समिती मंडळाचे भक्त मंडळी, सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष,व येथील जेष्ठ मंडळी महिला भगिनी, तरुण,तरुणींनी, भगवान श्रीराम भक्त मंडळी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला होता.या वेळी प्रभू श्रीरामचंद्रच्या भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता तर जय श्री राम च्या नावाने शिवणी दुमदुमली होती.
भगवान प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी अयोध्या नगरी येथून आलेल्या निमंत्रणरूपी मंगल अक्षता कलशाची सकल हिंदू समाज बांधवांच्या उपस्थितीत वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या वेळी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या शोभायात्रेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती तर महिलांनी डोक्यावर मंगल अक्षता कलश,व आरतीचे ताट घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतले होते. ‘जय श्रीराम’च्या जय घोषाने शिवणी गाव दुमदुमून गेले होते.
दि.२२ जानेवारी रोजी आयोध्यात प्रभू श्रीरामचंद्र भगवान विराजमान होत असून या अनुषंगाने संपुर्ण देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार असल्याचे सांगीतले जात आहे.तर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट,अयोध्या येथून शिवणीत आलेल्या या निमंत्रण रुपी मंगल अक्षता कलशाचे पूजन सर्वप्रथम जगदंबा माता मंदिर व श्री कृष्ण मंदिर येथे करण्यात आले या नंतर शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली होती.यात मोठ्या संख्येत सकल हिंदू समाज बांधवांनी महिलांनी सहभागी होऊन भगवा ध्वज फडकावत नृत्य केले. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जयघोष करीत भगव्या ध्वजासह टाळ, मृदंग, व ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत अग्रभागी सजवलेल्या चार चाकी वाहनावर प्रभू श्रीराम यांची प्रतिमा ठेवलेली होती. शेवटी ही शोभायात्रा व अक्षदा कलश येथील हनुमान मंदिरात स्थापित करण्यात आले.तर या वेळी हनुमान चालीसा,आरती पसायदान म्हणून समारोप करण्यात आले.
दि.२२ जानेवारी रोजी तीर्थक्षेत्र श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरी येथे होत असलेल्या भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्टा कार्यक्रम संपूर्ण जगात भव्य दिव्य स्वरूपात होणार असून दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत शिवणीसह परिसरातील प्रत्येक गावात वाडी तांड्यातल्या प्रत्येक परिवाराच्या घरात निमंत्रण पत्रक व प्रभू श्रीरामाची प्रतिमा व अक्षता वाटप होणार आहे. करिता प्रत्येक घरात ५ दिवे लावावेत व रांगोळी काढावी,भगवा ध्वज प्रत्येक घरावर लावावा तसेच प्रत्येक मंदीरांमध्ये महापूजा,किर्तन, प्रवचनाचे,महाआरतीचे नियोजन करावे,असे सकल हिंदू समाज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद व विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून आवाहन करण्यात आले आहे.