हिमायतनगरच्या लकडोबा हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू; गुरुवारी होणार काल्याच्या कीर्तनाने समारोप

हिमायतनगर। शहरातील लकडोबा हनुमान मंदिरात अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायणं, वीणा पारायणं, कीर्तन प्रवचन आदींच्या माध्यमातून गेल्या 5 दिवसापासून धार्मिक सप्ताह सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाचं आयोजन लकडोबा मंदिर कमिटीने केलं असून, परिसरातील महिला पुरुष भावीक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या 3 वर्षांपासून हिमायतनगर वाढोणा शहरातील लकडोबा हनुमान मंदिरात धार्मिक सप्ताह सोहळ्याच आयोजन करण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात दररोज काकडा आरती सकाळी 5 ते 6.30 , ज्ञानेश्वरी पारायणं सकाळी 7 ते 10 सुरू असून व्यासपीठ काशीबाई राखी या सांभाळत आहेत, त्यानंतर सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत भजन, दुपारी 1 ते 4 या काळात भागवत आणि रामकथा प्रवचन हभप ज्योतीताई पार्डीकर यांच्या मधुर वाणीतून सुरू आहे. कलिंका मंदिरातील महिला वारकऱ्यांकडून सायंकाळी 4 ते 5 हरिपाठ सुरू आहे, पुरुष वारकरी यांच्याकडून सायंकाळी 7 ते 8 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 यावेळेत हरिकीर्तन सोहळा विविध कथाकारांच्या मधुर वाणीतून सुरू आहे.
या धार्मिक कार्यक्रमास महिला मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,मंदिरात नित्यनेमाने 24 तास वीणा पारायणं केलं जातं आहे, एकुण या धार्मीक कार्यक्रमामुळे परिसरातील भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहाचा समारोप गुरुवारी होणार असून, सकाळी अभिषेक महापूजा गावातून टाळ मृदंगाच्या वाणीतून ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी शोभा यात्रा काढण्यात येऊन त्यानंतर सकाळी 11 वाजता हभप. विश्वंभर महाराज कदम आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन होऊन त्यानंतर महाप्रसाद वितरण होऊन समारोप केला जाणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास शहरातील व पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थित होऊन शोभा वाढवावी असे आवाहन लकडोबा हनुमान मंदिर कमेटी व गावकऱ्यांनी केलं आहे.
