पाच दिवसानंतर जाणापुरी येथिल साखळी उपोषण सुटले
नांदेड । मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत, या मुख्य मागणीसाठी अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे चालू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जानापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील गावकऱ्यांनी मागील पाच दिवसापासून साखळी उपोषण केले, २३ सप्टेंबर रोजी हे उपोषण तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले.
मागील चार दशकापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा विविध आंदोलनातून पुढे आला आणि सरकार दरबारी हा विषय ज्वलंत करण्यात आला मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांतिकारी मोर्चे निघाले जवळपास 50 मराठा समाज बांधवांनी आत्म बलिदान दिले 13700 गुन्हे मराठा समाज बांधावर दाखल करण्यात आले, तरीपण मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही इ.सन 2018 साली राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकले नाही, म्हणून आता मराठा समाज बांधवांनी 50% च्या आतले कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागण्यास सुरुवात केली.
त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे 17 दिवस आमरण उपोषण करून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दोष आश्वासन घेत आमरण उपोषण सोडवून त्याचे साखळी उपोषणात रूपांतरित केले. अंतरवाली सराटी येथील उपोषणास साथ देण्यासाठी व मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून कुणबी दाखले देण्यासाठी महाराष्ट्रातील गावा गावात आंदोलने,उपोषणे,ठिय्या यासह अनेक आंदोलने सुरू झाली,शासनाने मागून घेतलेला 40 दिवसाचा कालावधी आणि मराठ्यांनी दाखवलेली संयमी भूमिका ही अशीच अविरत चाळीस दिवस चालेल वेगवेगळ्या संविधानिक आंदोलनातून सरकारवर समाजाचा दबाव असाच कायम राहील आणि जर चाळीस दिवसानंतर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचे आंदोलने होतील आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार असेल असा गर्भित इशारा सुद्धा जानापुरीच्या साखळी उपोषणातून आंदोलनकर्त्यांनी दिला.
सदरील उपोषणास मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाज नांदेडचे शिलेदार श्याम पाटील वडजे लोहा तालुक्याचे बांधव लक्ष्मण मोरे, बाळासाहेब जाधव, सुभाष पाटील शिंदे डेरलेकर, नाना पाटील वानखेडे, बालाजी पाटील डेरलेकर यांच्यासह इतरही मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देत आपला पाठिंबा दर्शविला.
पाच दिवस सकाळी उपोषण करून आपल्या मागण्यांचे रीतसर निवेदन लोहा तालुका तहसीलदार व्यंकटेश मुंडे आणि सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांना देत उपोषणाची सांगता करण्यात आली. सदरील पाच दिवसीय साखळी उपोषण यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावातील सर्व समाज बांधवानी सहकार्य केले.