नांदेडमहाराष्ट्र

माहूर येथील विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून पत्रकार येणार एस.एम.देशमुख यांची माहिती

मुंबई| ‘मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण सोहळा येत्या 13 जानेवारी 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार येणार आहेत. त्यादृष्टीने नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजन करीत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे जोरदार तयारी सुरू असून तो नक्कीच यशस्वी होईल,’ असा विश्वास परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची ऑनलाईन बैठक झाली. राज्यातील ३५ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांपैकी ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीस हजर होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. बैठकीला विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, राज्याचे प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहाय्यक प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, भाऊसाहेब सकट (जि.कोल्हापूर), गजानन वाघ (वाशीम), विजय घरत (जि.पालघर), कमलेश ठाकूर ( जि.रायगड), जमिर खलपे (जि. रत्नागीरी), गोपीभाऊ लांडगे (धुळे), संजय हांगे (बीड ), सुनील वाघमारे (छत्रपती संभाजीनगर), सुभाष राऊत (नागपूर ), यशवंत थोटे (गोंदीया ), राम साळुंके (लातूर), बबलू दोडके (अमरावती), अहमदनगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, नांदेड जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, डॉ. बबन मेश्राम, ईश्वर माहत्रे, साजिद खान, संजय साळुंके, सरफरोज दोसानी, दिगंबर गायकवाड (नांदेड) आदी उपस्थित होते.

‘मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन राज्यपातळीवर त्यांचा गौरव केला जातो. हे सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात आणि राज्याच्या विविध विभागात घेतले जातात. 2022 चा पुरस्कार वितरण सोहळा नगर जिल्ह्यात कर्जत येथे घेण्यात आला होता. अतिशय भव्य दिव्य असा तो सोहळा झाला होता. त्या अगोदर नागपूर, पाटण, पालघर, वडवणी, अक्कलकोट आदी ठिकाणी हे सोहळे घेतले गेले होते. 2023 चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. माहूर, माजलगाव, तेल्हारा, अंबरनाथ, आर्वी, बत्तीस शिराळा, साक्री, आणि शिरूर तालुका पत्रकार संघांना तसेच दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्यांना हे पुरस्कार घोषित झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे 13 जानेवारी 2024 रोजी एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.

माहूर हे साडेतीन शक्तीपीठा पैकी आद्य पीठ आहे. येथे रेणुका मातेचं मंदीर असून हे तीर्थक्षेत्र देशभर प्रसिध्द आहे. मुंबईहून किनवटपर्यत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. किनवट येथून एका तासात आपण माहूरला पोहचू शकतो. पुणे येथून नांदेडसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नांदेड येथून रस्ता मार्गे पुढे माहूरला जाता येईल. नांदेड, विदर्भातून यवतमाळ, वर्धा, अकोला आदी ठिकाणाहून माहूरसाठी बस सेवा उपलब्ध आहे. नांदेडहून माहूरला जाण्यासाठी रस्ता मार्गे अडीच ते तीन तास लागतात. माहूरचा हा पुरस्कार वितरण कार्यक्रम परिषदेच्या परंपरेला साजेसा असाच होणार आहे. राज्यभरातून पत्रकार या कार्यक्रमासाठी येतील,’ असेही देशमुख यांनी सांगितले. तर, यावेळी विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की, ‘मराठी पत्रकार परिषदेचे आतापर्यंतची वाटचाल ही खूपच महत्त्वपूर्ण आहे. माहूर येथील पुरस्कार वितरण सोहळा खूपच चांगला होईल, असा आह्मा सर्वांना विश्वास आहे. लवकरच यासाठी विभागीय सचिव व राज्यातील उपाध्यक्ष यांची बैठक घेतली जाईल.’

बैठकीत प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी मागील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या बैठकीचा आढावा सांगितला. तसेच पुरस्कार प्राप्त जिल्हा तालुका संघांनी त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची माहिती दोन दिवसात पाठवावी, जेणेकरून त्यावर आधारित एक प्रेझेंटेशन तयार करता येईल. तसेच माहूर येथील कार्यक्रमात दाखवण्यासाठी डॉक्युमेंटरीही तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे, याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी नांदेड व माहूरच्या टीमला कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती दिली. पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे नांदेड व माहूर येथील आयोजकांनी आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमाच्या तयारीची माहिती देतानाच 13 जानेवारीच्या कार्यक्रमाचे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, हे सांगितले. अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी नगर जिल्ह्याला पुरस्कार दिल्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले, व नगर जिल्ह्याने गेल्या वर्षभर केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.

या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत – रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर_नगर आणि दक्षिण_नगर जिल्ह्यांना विभागून देण्यात आला आहे. वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार

1) मराठवाडा विभाग : माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड
2) लातूर विभाग : माहूर तालुका पत्रकार संघ, जिल्हा नांदेड
3) नाशिक विभाग : साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा धुळे
4) पुणे विभाग : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे
5) अमरावती विभाग : तेल्हारा तालुका पत्रकार संघ, जिल्हा अकोला
6) कोल्हापूर विभाग : बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली
7) नागपूर विभाग : आर्वी तालुका पत्रकार संघ, जिल्हा वर्धा
8) कोकण विभाग : अंबरनाथ तालुका पत्रकार संघ, जिल्हा ठाणे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!