
हिमायतनगर। तालुक्यात येणाऱ्या सरसम बु. ते करंजी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट पुलाच्या सुरक्षा भिंतीच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत पवना गावातील युवक बुधवारी आढळून आला. त्या जखमीं युवकावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेडला रेफर करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी 7 वाजता युवकाची प्राणज्योत मालवली. अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष असे मयत युवकाचे नावं आहे. युवकांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरुवारी सकाळीच हिमायतनगर पोलीस ठाणे गाठले आणि युवकाला जीवानिशी मारण्याचा शोध लावून न्याय देण्याच्या मागणीची केली आहे नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते भोकर या राष्ट्रीय महामार्ग असलेल्या सरसम ते करंजी दरम्यान नाल्यावरील सिमेंट पुलाच्या संरक्षण भिंतीच्या मध्यभागी कोणीतरी अज्ञाताने जिवे मारण्याच्या उद्देशाने पवना येथील युवक अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष यास पाठीमागून येवून डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले होते. हि घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला आहे. डोक्यावर गंभीर प्रहार झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन युवक मयत झाला असल्याचे गृहीत धरून मारेकऱ्यानी तेथून पलायन केले. मात्र रात्रभर युवक त्याच अवस्थेत राहिल्याने खूप रक्तस्त्राव झाला. बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना या रस्त्यावरून मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरीकांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसाना देताच जायमोक्यावर पोलीस दाखल झाले होते. युवकावर रात्रीच कुण्यातरी अज्ञाताने हल्ला केला असावा असा संशय अनेकांनी व्यक्त केला. या घटनेमागे कोणते कारण आहे, युवकाला मारण्याचा उद्देश काय..? याबाबत घटनास्थळी जमलेल्या लोकांमध्ये उलट सुलट चर्चा होत होती.
प्राप्त माहितीनुसार सरसम बीटचे पोलीस जमादार श्री कदम सकाळीच आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोचले आणि या ठिकाणाहून दुचाकी क्र. एम. एच. ३८ क्यू ६७१५, चप्पल, आणि एक हाथोडी गंभीर जखमीच्या शेजारी आढळली ती जप्त केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सकाळी १० वाजता घटनास्थळी फौज फाट्यासह भेट देऊन पंचनामा केला आहे. गंभीर जखमीस ताब्यात घेऊन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती अतिगंभीर असल्याने सदर युवकास उपचारांसाठी नांदेडला पाठविण्यात आले होते. दरम्यान गंभीर जखमी युवक अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष याचा उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी ७ वाजता मृत्यू झाला आहे.
गंभीर जखमी युवकांवर नांदेड येथे उपचार सुरू असताना हिमायतनगर पोलिसांना हा अपघात नसल्याचा संशय आल्यावर त्यांनी तपासाची चक्रे फिरवीत सरसम, सोनारी फाटा येथून सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून तपासाला गती दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्याचे स्पष्टीकरण होणार असून, दरम्यान युवकाचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात मयत युवकाचे नातेवाईक गुरुवारी सकाळी दाखल झाले. आणि युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. पोलीस या खुनाच्या घटनेचा तपास लावण्याचे मोठे आव्हान उभे आहे. मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 302 म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळपासून पोलीस ठाणे परिसरात लाईट नसल्याने गुन्हा क्रमांक व गुन्ह्याच्या बाबतीत इतर माहिती मिळू शकली नाही, दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या पथकाने भेट देऊन या घटनेचा तपास करत आहेत, तसेच भेट दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी गुन्ह्याच्या तपासाला गती देऊन आरोपीला तात्काळ अटक करून खुनाचा छडा लावा अश्या सूचना दिल्या आहेत.
