नांदेड| जलजीवन मिशनअंतर्गत नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवण्यासाठी तसेच त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी विभागीय बैठकींमध्ये सदरहू कामांचा फेरआढावा घेण्याचे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिले आहे.
शुक्रवारी सकाळी विधानसभेत लक्षवेधी सुचनांवरील चर्चेत अशोकराव चव्हाण यांनी या महत्वाच्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, स्त्रोत नसल्यामुळे अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. हे स्त्रोत बळकट करण्यासाठी ग्रीडची सुद्धा व्यवस्था आहे. मात्र, काही ठिकाणी ग्रीडची कामे जेमतेम १० टक्केच पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी संपूर्ण कामाचे अंदाजपत्रकच तयार केलेले नाही. काही गावांमध्ये पूर्ण गावाऐवजी अर्ध्याच गावात पाईपलाईनची कामे झाली आहेत. खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी तरतूद नाही.
या कामांमधील त्रुटी आताच दूर केल्या नाहीत तर कामे पूर्ण झाल्यावर त्यासाठी पैसा शिल्लक नाही, या सबबीखाली ती कामे तशीच अर्धवट राहतील. सुधारित कामांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून शासनाकडे प्रस्ताव सुद्धा आलेले आहेत. ही कामे नेहमी होणारी नाहीत. त्यामुळेच राज्यातील सर्व कामांचा आताच आढावा घेऊन अंदाजपत्रके व कामांचे स्वरूप सुधारित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावेत. नांदेड जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणींबाबत पुढील आठवड्यात बैठक नियोजित आहे. त्याप्रमाणेच राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील कामांचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी अशोकराव चव्हाण यांनी केली.