नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड केंद्रावर दुसऱ्या दिवशी आंबेडकरवादी मंच, नांदेडच्या वतीने वीरेंद्र गणवीर लिखित, राहुल जोंधळे दिग्दर्शित “गटार” या नाटकाचे उत्तम सादरीकरण झाले. या नाटकाच्या निमित्ताने उत्तम, कल्पक दिग्दर्शन नांदेडकर रसिक प्रेक्षकांना अनुभवता आले.
गटार साफ करणार्या लोकांची आणि त्यांच्या कुटुंबाची हि कथा मानवी व्यवस्थेवर भाष्य करते. प्रत्येक दलीत गटार साफ करत नाही पण गटार साफ करणार प्रतेक दलीत का असतो? २०१४ मध्ये गटारीत उतरून काम करण्यास बंदी आणली आणि हे काम यंत्राद्वारे करवून घ्या अशी सूचना असतानाही अनेक सफाई कामगारांना गटारात उतरून काम करावे लागते. गटार साफ करता करता मारणारा व्यक्ती हा शहीद असतो गटार या भारताची एक अशी सीमा आहे, जिथे हे लोक आपल्या भारत देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढतात. आणि त्यांनाच तुच्छतेची का वागणूक मिळते? अश्या अनेक प्रश्नावर भाष्य करत हे नाटक पुढे जाते.
या नाटकाच्या निमित्ताने अभिनयाची जुगलबंदी पहावयास मिळाली. यातील बाबाची भूमिका साकारणारा कलावंत विजय गजभारे, रवि- प्रितम भद्रे, गौतम – गौरव कदम यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या तर यादव – अजिंक्य गायकवाड, अम्मा – प्रांजल मोतीपवळे, शैली- पद्मजा पंडित, अस्मिता- अरोशी कोमटवार, कामगार- चंद्रकांत तोरणे, अविनाश बोनाकुडकेवार, सम्राट डोईबळे यांनी आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.
तांत्रिक बाबीतही हे नाटक सरस होते यातील माणिकचंद थोरात यांची प्रकाशयोजना आशयपूर्ण होती तर राहुल जोंधळे आणि अविनाश बोनाकुडकेवार यांचे नेपथ्य, चंद्रकांत तोरणे यांची रंगभूषा वेशभूषा, अनिल दुधाटे यांचे संगीत, हे सर्व विषयानुरूप होते. रंगमंच व्यवस्था- करण गुडेवार आणि सम्राट डोईबळे यांनी सांभाळली. दि. २४ नोव्हेंबर रोजी कल्चरल असोसिएशन, नांदेडच्या वातीने अशोक बुरबुरे लिखित, डॉ. विजय कुमार , माहुरे दिग्दर्शित “मयती म्होर्ल आग्टं” या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण होणार आहे.