नांदेड | दयानंद कला महाविद्यालय,लातूर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 ते 15 ऑक्टोंबर 2023 या दरम्यान आंतर महाविद्यालयीन ज्ञानतीर्थ- 2023 युवक महोत्सव मोठ्या हर्षोल्हासात सुरू आहे.05 वेगवेगळ्या मंचावर विविध कलाप्रकार सादर होत आहेत.त्यापैकी लोकनेते विलासराव देशमुख मंच क्रमांक 04 वरील ‘ वादविवाद स्पर्धे ‘ ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सदरील वादविवाद स्पर्धेसाठी ‘ एक देश एक निवडणूक हे धोरण योग्य/अयोग्य ‘ हा विषय देण्यात आलेला होता.विद्यार्थ्यांनी प्रतिकूल आणि अनुकूल अशा दोन्ही बाजूंनी आपले सडेतोडपणाने विचार मांडले.
‘ एक देश एक निवडणूक ‘ करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे.हा ज्वलंत मुद्दा डोळ्यासमोर ठेवून वादविवाद स्पर्धेसाठी सदरील विषय देण्यात आला.या वादविवाद स्पर्धेत बोलताना स्पर्धक असे म्हणाले की,इतर देशात हा प्रयोग यशस्वी होत असेल तर आपल्या देशात का नको असे मत मांडले तर काही विद्यार्थ्यांनी हे धोरण आणले तर संविधानालाच धोका पोहोचणार आहे,असाही विचार मांडला.
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन,प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड व विद्यार्थी विकास विभाग,संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार या मंचावरील ‘ वादविवाद स्पर्धा ‘ यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी डॉ.गौरव जेवळीकर,डॉ.गोविंद रामदिनेवार,डॉ.अशोक नारनवरे,डॉ.रामचंद्र भिसे व परीक्षक आणि मंच प्रमुख डॉ.भाऊसाहेब आदमाने व इतर सदस्य या सर्वांनी परिश्रम घेतले.