उस्माननगर परिसरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन. राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळले , वाहतूक ठप्प, दुकाने बंद
उस्माननगर, माणिक भिसे। मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण द्यावे , या मागणीसाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा.वा नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्गावरील उस्माननगर चौकात व किवळा ,लोंढे सांगवी , ढाकणि , कलंबर (बुद्रुक खुर्द) , वाघाळा या ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तर उस्माननगर येथील चौकात टायर जळण्यात आले तर गावातील प्रतिष्ठाने , दुकाने बंद करून प्रतिसाद दर्शविला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उस्मान नगर परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहेत . उस्माननगर कलंबर( बुद्रुक) (खुर्द) तालुका लोहा व अन्य ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कॅण्डल माॅर्च काढण्यात आले. तसेच गावागावात साखळी व आमरण उपोषणही सुरू केले आहेत. उस्माननगर येथील श्रीराम लक्ष्मण काळम पाटील यांच्यासह अनेक जण साखळी व अमर उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला अनेक गावातील विविध समाज व मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
दरम्यान आमरण उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवली याची बातमी पसरतात कंधार तालुक्यातील गावा गावामध्ये मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन व गाव बंद करून शिंदे सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी दिल्या .
नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्गावरील उस्माननगर चौकात टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . मराठा समाजाच्या युवकांनी घोषणाबाजी करीत आरक्षणासाठी आंदोलन केले. दिवसभर गावातील किराणा दुकाने बंद करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मराठा सकल मराठा समाज बांधवांनी युवकांनी टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
परिसरात होत असलेल्या रास्ता रोको आंदोलन व उपोषणाला गालबोट लागू नये म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित कायम राहावी म्हणून उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जमदार , पोलीस कर्मचारी, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा
उस्माननगर येथील मुस्लिम समाजातील तरुण समाज कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रतिनिधी आमिनशा फकीर यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या श्रीराम काळम पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे