हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयांमध्ये दि . 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षण सहसंचालक यांच्या आदेशानुसार भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त दक्षता जनजागृती शपथ पर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
या शपथ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने हे लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशातील परिस्थिती पाहता आज विद्यार्थ्यांनी देश हित लक्षात ठेवून भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन करण्यासाठी ध्येय उराशी बाळगले पाहिजे. तरच आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. असे सविस्तर मत त्यांनी मांडले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप माने यांनी मनोगतातून सांगितले की, आपल्या देशाच्या विकासात भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे. तो जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत देशाचा सामाजिक, राजकीय, आर्थिक दृष्टीने विकास होणार नाही. असे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडले. व शेवटी भ्रष्टाचाराच्या विरोधी शपथेचे सामुहिक वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी केले.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रमुख डॉ. एल . एस. पवार यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी मानले.