संतप्त मराठा आंदोलकांकडून खासदार चिखलीकरांच्या गाड्यांची तोडफोड
कंधार, सचिन मोरे| माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील तेलंग यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दोन गाड्यावर संतप्त मराठा आंदोलकांनी हल्लाबोल चढवत गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना कंधार तालुक्यातील आंबुलगा येथे गुरुवार दि.२६ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली,यामुळे मराठवाड्यात एकच खळबळ उडाली असून हल्ला झालेल्या दोन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खासदारांसह त्यांच्या सोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आली.सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलीसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तोडफोडीत दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
संतप्त मराठा आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत चुलीत गेले नेते,चुलीत गेला पक्ष,एक मराठा लाख मराठा असा नारा देत मराठा आंदोलकांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गाव-बंदी केली आहे.अशा प्रकारची गाव-बंदी कंधार तालुक्यातील आंबुलगा येथील गावकऱ्यांनी तहसीलदार व प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे पुढाऱ्यांनी आंबुलगा गावात प्रवेश करू नये असे लेखी निवेदन देण्यात आले होते,आंबुलगा येथे खा.प्रताप पाटील चिखलीकर हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील तेलंग यांना भेटण्यासाठी ते गुरुवारी उशिरा आंबुलगा येथे आले होते.
चिखलीकर तेलंग यांना भेटण्यासाठी घरात गेले असता घराबाहेर संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यातील संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गाड्यावर दगड-फेक केली,त्यामुळे दोन गाड्यांचे काचा फुटून व मार लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार घडल्यानंतर उपस्थित आंदोलनकर्ते व पोलीसांमध्ये चांगलीच बचाबाची झाल्याचे ऐकावयास मिळाले. या घटनेमुळे आंबुलगा गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अद्याप गुन्हा दाखल नाही
सदरील प्रकरणाचे वृत्त लिहीपर्यंत अद्याप कंधार पोलीस स्टेशन मध्ये कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता महाराष्ट्र मध्ये अनेक गावांमध्ये मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे,मंत्री,खासदार,आमदार या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.
सदैव मराठा समाजासोबतच,खा.चिखलीकर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा देखील पाठिंबा आहे समाजामुळेच आम्ही आज या पदावर काम करीत आहोत,आज मराठा आंदोलकाच्या भावना अतिशय संतप्त व तीव्र असून त्या भावना खऱ्या आहेत,त्यांच्या विचाराशी मी देखील सहमत आहे,माझा कोणावरही राग नाही,अशा प्रकारच्या भावना नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी न्यूजफ्लॅशडॉटइन च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.