वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन
हिमायतनगर,परमेश्वर काळे| वाढोणा शहरातील पुरातन कालीन भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्रम्होत्सवात विजयदशमी दिनी हजारो भाविक भक्तांनी व्यंकटेश्वर बालाजीचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. यावेळी पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या वतीने भाविकांना बुंदीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.
शेकडो वर्षापासून या मंदिरात भगवान व्यंकटेश बालाजी, विष्णू, ब्रम्हदेव, महिषासुर मर्दिनी, स्कंद कार्तिके, श्रीगणेश यासह अन्य देवी – देवतांच्या काळ्या पाषाणातील मनमोहक मुर्त्या स्थापित आहेत. प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी अश्विनशुद्ध प्रतिपद शके १९४५ रोज रविवारी सकाळी ४ वाजता मंत्रोचार वाणीत भगवान बालाजीचा महाअभिषेक महापूजा, आरती करण्यात आली. विजयादशमी असल्याने दि.२४ मंगळवारी श्री व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात येथील मानकरी श्याम पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी कालिंका मातेच्या मंदिरातून निघालेली विजया दशमीच्या मिरवणुक सायंकाळी ७ वाजता ढोल ताश्याच्या गजरात श्री बालाजी मंदिरात पोचली. यावेळी हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या या भक्तांना मंदिराचे पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या हस्ते बुंदीच्या स्वरूपात तीर्थ – प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी गोविंदा हरे गोविंदा श्रीव्यंकटेशा गोविंद नामाचा गजर करण्यात आला.
याच श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात मंदिरात महिषासुर मार्दीनीची मूर्ती असल्यामुळे ब्राम्होत्सव पर्वकाळात बालाजी मंदिर दर्शनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. या काळात येथील महिला मंडळाच्या वतीने शारदा देवीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवसाचा उत्सव साजरा केला जात आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला माता शारदा देवीची मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढून विसर्जन केली जाते.