नांदेड| माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास ग्रंथालयात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी येणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असतांना विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे चरित्र अवश्य वाचावे. नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजचे ग्रंथपाल राजीव वाघमारे यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय वटमवार यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला कोंडीबा गाडेवाड, विठ्ठल डाके यांची विशेष उपस्थिती होती.