गावठाण विस्तारवाढ करून प्लॉट्स व घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे

माहूर/नांदेड। निसर्गरम्य वातावरण, घनदाट सागवानी जंगल, शेख फरीद दरग्यावर अखंड कोसणारा धबधबा,वरच्या डोंगरातून येणारा नाला आणि तो अडवून जोखीम पतकरून आणलेले साठवण तलाव,पर्यटन स्थळ अशी विविध ख्याती असलेल्या वझरा ता.माहूर येथील अनेक नागरिक सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू ) चे जनरल कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिक तथा संघटनेचे सभासद वझरा शेख फरीद येथील मारोती मंदिरा जवळील वाय पॉईंट येथे तारीख एक ऑक्टोबर रोज रविवार पासून सामूहिक उपोषणास बसले आहेत.
वझरा गांव हे सुप्रसिद्ध असले तरी एक समस्या मात्र तेथील नागरिकांना मागील पन्नास वर्षांपासून सतावते आहे.ती म्हणजे एकीकडे झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना आणि गांव,शहराचा विकास होत असताना मौजे वझरा शेख फरीद येथे मात्र मागील पन्नास वर्षात नवीन प्लॉट्स पडले नाहीत. त्याचे कारण असे की, वझरा येथे गावाखारीची खाजगी जमीन मालक एकही व्यक्ती नाही. सर्व जमीन ही श्री दत्त शिखर संस्थांनची आहे. अर्थातच मालक म्हणून सुपरिचित असलेल्या महंत यांना आज पर्यंत प्लॉट्स पाडून गावठाण विस्तारवाढ करावा म्हणण्याची हिंमत कोणी केली नाही. हे सर्व कायदा म्हणून नाही तर श्रद्धा आणि भावनेचा मुद्दा आहे.
वझरा येथील मूळचे रहिवाशी असलेले कॉ.गंगाधर गायकवाड हे नांदेड येथे स्थायिक झाले असले तरी त्यांनी मागील दोन वर्षांपासून वझरा गावठाण विस्तारवाढ आणि सोलापूर कुंभारीच्या धरतीवर गावखारी येथे प्लॉट्स पाडून द्यावेत आणि घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान स्वरूपात देण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारकडे सातत्याने केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हिरवा कंधील दाखविला असून स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र उदासीन असल्याचे दिसते.सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली असून मोर्चे देखील काढण्यात आले आहेत. तसेच कॉ.गंगाधर गायकवाड हे ‘द हिंदू’ राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राचे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांनी अनेक कामगार कष्टकऱ्यांना न्याय दिला आहे.
मागच्या आठवड्यात त्यांनी नांदेड शहरातील पूरग्रस्तांना दिलासा देत नऊ कोटी रुपये वाटप करण्यास भाग पाडले असून त्यांनी यासाठी दोन महिन्यामध्ये चार आंदोलने करून अनेक वेळा जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाकडे पत्र व्यवहार केला आहे.
गांधी जयंतीच्या पुर्व संध्येला त्यांनी सामूहिक उपोषणास सुरवात केली असून होणाऱ्या ग्राम सभेमध्ये या उपोषणाचे पडसाद उमटणार आहेत.
गावगाड्याचा आणि जमीन अधिगृहन करून प्लॉट्स पाडण्याची मागणी असल्यामुळे जमीन कब्जेदार तथा दावेदार मंडळीकडून घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी निवेदनात नमूद केले असल्यामुळे वझरा शेख फरीद येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता आहे.परंतु तसे दिसून येत नाही. मागील पन्नास वर्षांपासून विस्थापित असलेल्या वझरा गावामध्ये काय कारवाई होणार याकडे संपूर्ण गावाचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासनाच्या निर्णयाची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी जोपर्यंत वझरा येथे येऊन प्रत्यक्षात चर्चा करणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष चरण चव्हाण, सचिव विक्रम टाकळीकर, उपाध्यक्ष जाणू पवार, बाबू टाकळीकर, सुनील चांदेकर, बाबू दोहिले, वाल्मिक मुंडे,ज्ञानेश्वर उरवते, केशव राठोड, प्रमोद कदम,चंद्रकांत लोखंडे,लता गायकवाड, वंदनाबाई मुरकुटे, प्रयागबाई लोखंडे, रामदास लोखंडे,राजू टेंबरे,इंदिराबाई टेंबरे, अर्चना नटवे, सायनाबाई जाधव,वदंनाबाई कुमरेआदी प्रयत्न करीत आहेत. या उपोषणास सरपंच दिपक केंद्रे यांनी पूर्ण पाठींबा दिला असून गावठाण विस्तार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून सांगितले. ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सीटू च्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
