पोलीस ठाण्याच्या गणपतीचं फुलांची उधळण करीत नवव्या दिवशी झालं विसर्जन
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या वर्षीपासून हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येत आहे. लोकमान्य टिळकांनी घालून दिलेल्या उत्सवाचा आदर्श घेऊन हिंदू – मुस्लिम एकसंधता टिकवून राहावी या उद्देशाने पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. नवव्या दिवशी गणपती बाप्पाची विधीवत पुजा करून फुलांची उधळण करत भजनी मंडळाच्या गीतात शहरातील मुख्य रस्त्यानी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हिमायतनगर शहरातील हिंदू -मुस्लिम व सर्व धर्मीय बांधव सहभागी झाले होते. तीन तासाच्या शोभा यात्रेनंतर येथील श्री कनकेश्वर तलावाच्या नजीक असलेल्या विहिरीत श्रीचे जल्लोषपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या नेतृत्वाखाली गणपती बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. नित्यनेमाने आरती पूजा करत नवव्या दिवशी म्हणजे बुधवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी १२ वाजता भजनी मंडळाच्या मधुर आवाजात गणपतीची आरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षै लवकर या… चा गजर व फुलांची उधळण करत शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शोभा यावी म्हणून पळसपूर येथील भजनी मंडळ संच आनंदोत्सवात सहभागी झाला होता. शहरात मिरवणूक येताच ठिकठिकाणी मिरवणुकीचे व गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करत अनेकांनी मिरवणुकीचे स्वागत केले.
गणपती बाप्पाची मिरवणूक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्यास श्री वरद विनायक मंदिरा नजीकच्या कनकेश्वर तलावात दाखल झाली. येथे श्रीचे मान्यवरांसह सर्व पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या हस्ते महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आला. यावेळी अनेकांनी विघ्नहर्त्या गणरायाला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढ… सर्वाना सुखी समृद्धी ठेव अशी कामना करत गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या.. आमचा गणपती चालला ना… पुढच्या वर्षी येईल ना….असे म्हणत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देत श्रीच्या मूर्तीचे आनंदाने विसर्जन करण्यात आले.
यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्मिता दिलीप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ पाटील, बिट जमादार कोमल कागणे, जमादार अशोक शिंगणवाड, पोना. नागरगोजे, डीएसबीचे अविनाश कुलकर्णी, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, पांडुरंग तुप्तेवार, काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अन्वर खान, विलास वानखेडे, रॅम नरवाडे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश चीलकावार, मुन्ना शिंदे, आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीस कर्मचारी व गणेशभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.
वर्धमान मेन्स वेयरतर्फे थंड बदाम लस्सीचे वितरण
पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव मिरवणूक येणार असल्याचे समजल्यानंतर शहरातील प्रसिद्ध वर्धमान मेन्स वेयरचे संचालक आशिष जैन व सुमित जैन यांनी उमरखेड येथून थंड बदाम लस्सी मागविली होती. विसर्जन मिरवणूक येताच वर्धमान मेन्स लस्सीचे वितरण करण्यात आले. वर्धमान मेन्स वेयरतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने गणेशेभक्तांचे स्वागत केले जाते यंदा पोलीस प्रशासनाच्या मिरवणुकीत सामील झालेल्या सर्वाना लस्सीचे वितरण केले त्याबद्दल सर्वानी आभार मानले.